शालेय साहित्याच्या भेटीतून फुलले विद्यार्थ्यांचे हास्य; अग्नीपंख फाउंडेशनचा उपक्रम ठरला प्रेरणादायी

श्रीगोंदा| दि. ०६ जुलै २०२६

गणेश कविटकर

 

“शिक्षण हीच खरी संपत्ती” या विचाराला कृतीची जोड देत अग्नीपंख फाउंडेशनने ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील गरजू व उपेक्षित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.

ज्या विद्यालयात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे, अशा संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्योजक गणेश साळुंके, विकास आढाव आणि अनिरुद्ध लाकुडझोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच अंकुश कऱ्हे आणि प्रतिक्षा रोटकर यांची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना विकास आढाव म्हणाले, “आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचा आदर करून जीवनात वाटचाल केली तर यश निश्चित मिळते. माझे वडील निरक्षर असले तरी त्यांचे संस्कार आणि मार्गदर्शन माझ्यासाठी लाखमोलाचे ठरले. भविष्यातही अग्नीपंख फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमांना माझे सहकार्य कायम राहील.”

उद्योजक गणेश साळुंके यांनी समाजसेवेची प्रेरणा वडिलांकडूनच मिळाल्याचे सांगत, “समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळणे हेच माझ्यासाठी मोठे समाधान आहे,” असे नमूद केले.

 

 

अग्नीपंख फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन आढाव म्हणाले, “शाळा आणि विद्यालये ही समाजपरिवर्तनाची खरी केंद्रे आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविण्याचा आमचा संकल्प आहे. लवकरच शिक्षकांसाठी मोटिव्हेशन कॅम्प तसेच विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.”

कार्यक्रमात अग्नीपंख फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. संजय लाकुडझोडे आणि बाळासाहेब पवार यांनीही मनोगत व्यक्त करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य मधुकर सुपेकर यांनी केले. यावेळी सचिन कातोरे, रमेश साळुंके, किसन वऱ्हाडे, जयश्री डोंगरे, बाळासाहेब शिंदे, तुकाराम बोरगे, गौतम वाळुंज, माणिक ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश शिंदे यांनी केले, तर सुनील डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.