श्रीगोंद्यात संत शेख महंमद महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनामाचा दिव्य महायज्ञ……..

श्रीगोंदा  | दि. 19 फेब्रुवारी 2026

गणेश कविटकर

 

श्री. संत शेख महंमद महाराज मंदिर, श्रीगोंदा परिसरात भक्तिरसाचा वर्षाव; हजारो भाविकांची उपस्थिती

 

श्रीगोंदा : तालुक्याचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत परंपरेतील महान संत श्री.संत शेख महंमद महाराज यांच्या ३२७ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा नगरी सध्या अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. संजीवनी समाधी सोहळा व यात्रा महोत्सवाच्या पावन निमित्ताने मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह, भव्य तुकाराम गाथा पारायण तसेच योगसंग्राम ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र नामघोषाचा मंगल नाद दुमदुमत आहे.

मंदिर परिसरात सकाळ-सायंकाळ हरिनामाचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाच्या निनादात चालणारे गाथा पारायण आणि भावस्पर्शी कीर्तनामुळे वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेले आहे. या सप्ताहात ह.भ.प. भूषण महाराज महापुरुष यांनी कीर्तनसेवा सादर करत संत चरित्र, त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा गूढार्थ आणि समाजप्रबोधनाची शिकवण प्रभावी शब्दांत मांडली. त्यांच्या ओजस्वी वाणीतून संतांच्या कार्याचा गौरव ऐकताना भाविकांच्या डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू दाटून आले.

कीर्तनादरम्यान संत शेख महंमद महाराज हे जागृत देवस्थान असून आजही त्यांच्या कृपेचा प्रत्यय अनेकांना येतो, असे सांगताना महाराजांनी संतांनी दिलेला अहिंसा, मानवता, समता व बंधुभावाचा संदेश आत्मसात करण्याचे आवाहन केले. “संतांवरील दृढ श्रद्धा व नामस्मरण हाच जीवनातील खरा आधार” असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

संतांच्या दर्शनासाठी व नामसप्ताहात सहभागी होण्यासाठी तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात हजेरी लावत आहेत. मंदिर परिसरात शिस्तबद्ध व्यवस्थापन, भजन-कीर्तनाचा अखंड कार्यक्रम आणि भाविकांची भक्तिभावाने ओसंडून वाहणारी उपस्थिती यामुळे श्रीगोंदा नगरीत सर्वत्र उत्सवी व आध्यात्मिक वातावरण अनुभवास येत आहे.

आगामी दिवसांतही विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तनसेवा, पारायण सोहळे व महाप्रसादाच्या आयोजनातून हा संजीवनी समाधी सोहळा अधिक भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार असून श्रीगोंद्यातील हा आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.