श्रीगोंदा| दि . 25 एप्रिल 2026
गणेश कविटकर
श्रीगोंदा शहराच्या वाढत्या विकासगतीला नवे बळ देणाऱ्या “बगाडे वन लँडमार्क” या आकर्षक आणि आधुनिक प्रकल्पाचे भूमिपजन उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडले. दौंड – जामखेड हायवे लगत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसराच्या व्यावसायिक आणि आर्थिक उन्नतीस नवी दिशा मिळणार आहे.
या मंगल प्रसंगी ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्ट, कोंभळीचे अध्यक्ष ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या शुभहस्ते भूमिपजन करण्यात आले. कार्यक्रमास श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते व सदा फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती सुनंदा पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थिती मुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांनी आपल्या आशीर्वचनातून बगाडे कुटुंबीयांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, हा प्रकल्प समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर सकारात्मक परिवर्तन घडेल, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार विक्रम पाचपुते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बगाडे कुटुंबीयांनी नेहमीच श्रीगोंदा शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून प्रगतीची नवी दिशा दिसून येते. ‘बगाडे वन लँडमार्क’ हा प्रकल्प निश्चितच रोजगारनिर्मिती व आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
याप्रसंगी बोलताना श्रीमती सुनंदा पाचपुते म्हणाल्या की, बगाडे कुटुंब व पाचपुते कुटुंब यांची गेल्या पन्नास वर्षापासून स्नेहाचे संबंध आहेत. बगाडे कुटुंबाची परिसरात व्यवसायासाठी खूप मोठी विश्वासार्हता आहे त्यामुळे त्यांनी सुरू केलेल्या प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बगाडे यांनी सादर करत प्रकल्पाची वैशिष्ट्ये व भावी नियोजन मांडले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी ओघवत्या शैलीत केले.
या उद्घाटन सोहळ्यास बगाडे कुटुंबीयांसह व्यापारी, नागरिक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. “बगाडे वन लँडमार्क” हा प्रकल्प भविष्यात श्रीगोंदा शहराच्या प्रगतीचा नवा केंद्रबिंदू ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
