श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- कष्टकरी, छोटे व्यापारी आणि महिला बचत गटातील महिलांच्या आशीर्वादातून उभा राहिलेला वेदराज डेव्हलपर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्रीगोंदा शहराच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रभू श्रीराम नवमीचे औचित्य साधून गुरुवारी वेदराज डेव्हलपर्सच्या ५१ व्यावसायिक गाळे व ३४ निवासी फ्लॅट्सच्या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे व चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा प्रकल्प श्रीगोंदा शहराच्या प्रवेशद्वारावर उभारला जाणार असून, तो शहराच्या वैभवात निश्चित भर टाकणारा ठरणार आहे.
यावेळी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयापुढे फारशी वर्दळ नव्हती, मात्र शहराच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे उपनगरांची वाढ झाली आणि विकासाची नवी दारे खुली झाली. अशा परिस्थितीत वेदराज डेव्हलपर्ससारखा आधुनिक प्रकल्प श्रीगोंद्यास महानगरांच्या धर्तीवर नेण्यास मदत करेल. तसेच युवा उद्योजक शुभम वाडगे यांनी वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेत सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अधिक योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. प्रतिभा अक्का पाचपुते तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर राजेंद्र नागवडे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक करत, भविष्यात अशाच प्रकारचे प्रकल्प इतर भागातही उभारावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्षा सौ. अलका अनभुले, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, प्रशांत गोरे, अख्तर शेख, अमीन शेख, चैतन्य महिला बचत गटाच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. रुक्मिणी वाडगे, अजय गावडे, लौकिक मेहता, श्री कन्स्ट्रक्शनचे महेश चौधरी, निलेश चौधरी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत चैतन्य स्टोन क्रशरचे संचालक शुभम वाडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या चेअरमन सौ. सायली वाडगे यांनी मानले.
शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय वेदराज डेव्हलपर्सचा हा प्रकल्प केवळ इमारत नसून श्रीगोंदा शहराच्या आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण करणार आहे.
