चिखली (ता. श्रीगोंदा) :
पाणीटंचाईवर मात करत गावाच्या शाश्वत विकासाकडे नेणारा प्रेरणादायी उपक्रम चिखली येथे साकार झाला आहे. पुणे येथील रेलफॉर लॅब्ज व सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि.चे सर्वेसर्वा, प्रसिद्ध उद्योगपती दीपक नाथानी यांच्या सेवादीप फाउंडेशनच्या माध्यमातून चिखली गावातील पुष्पतलाव व विजयतलाव या दोन तलावांचे गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. या जलसंधारण कामांचे लोकार्पण उद्योगपती दीपक नाथानी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतलेल्या जनता जनार्दन शिक्षण संस्थेच्या सचिव मा. मनालीताई झेंडेपाटील यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमप्रसंगी चिखली ग्रामस्थांच्या वतीने दीपक नाथानी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दीपक नाथानी यांनी त्यांच्या मातोश्री स्व. पुष्पा विजय नाथानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेवादीप फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील जांभळी तलाव व पांढरवळ तलाव या दोन तलावांचेही खोलीकरण करून दिले आहे. या कामांमुळे तलावांची पाणीसाठवण क्षमता जवळपास दुप्पट वाढली असून, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच गावात पाण्याची टाकी, बोअरवेल यांसारखी पायाभूत कामेही त्यांच्या सहकार्याने पूर्ण झाली आहेत.
भविष्यात सेवादीप फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील उर्वरित तलावांचे खोलीकरण, तसेच गरजू कुटुंबांसाठी घरे बांधून देण्याचा संकल्पही दीपक नाथानी यांनी व्यक्त केला. या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे सर व सरपंच कुलदीप भैय्या कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास भरत झेंडे, चेअरमन गोरख झेंडे, बाबा महाराज झेंडे, संभाजीराजे कदम, उपसरपंच अक्षय बोखारे, पांडुरंग महाराज गाडेकर, बापू झेंडे, शिवाजी रामचंद्र झेंडे, केशव झेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
