पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया व पाटील हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

श्रीगोंदा | दि. ०६ जानेवारी २०२६

गणेश कविटकर, श्रीगोंदा

 

समाजाच्या आरोग्यासाठी सातत्याने झटणारा पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहावा, या प्रेरणादायी उद्देशातून पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील पाटील मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या सहकार्याने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाला यशस्वी केले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, भारतीय जनता पार्टीच्या उपगटनेत्या व नगरसेविका मीराताई शिंदे तसेच डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते आद्य मराठी वृत्तपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व आरोग्याचे अधिष्ठाता भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांचे स्वागत व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर यांनी, डॉ. नितीन खामकर यांचे स्वागत तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी तर नगरसेविका मीराताई शिंदे यांचे स्वागत पत्रकार गायत्री ढवळे यांनी केले. डॉ. संदीप पाटील यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे स्वागत करून शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकला.

धावपळीच्या, तणावपूर्ण पत्रकारितेमुळे उद्भवणारे मानसिक व शारीरिक आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत डॉ. संदीप पाटील व डॉ. नितीन खामकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. ताजे व गरम अन्न, शीतपेयांऐवजी ताकाचा वापर, नियमित व्यायाम, फ्रिजमधील पदार्थ टाळणे तसेच कुटुंबात सकारात्मक वातावरण ठेवणे या बाबी पत्रकारांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरसेविका मीराताई शिंदे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्याने शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. पत्रकारितेची आजची आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता, पत्रकारांना आरोग्यसेवेत सवलत मिळावी यासाठी मेडिकल असोसिएशनकडे पाठपुरावा करण्याची भूमिका घेण्याची विनंती त्यांनी डॉ. पाटील यांना केली. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी पत्रकार व पोलीस हे समाजसेवेतील एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत, प्रत्येकाने दररोज किमान २५ ते ३० मिनिटे व्यायाम करावा व कुटुंबाला वेळ द्यावा, असे आवाहन केले. आपल्या सेवाकाळातील पत्रकारांशी निगडित आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.

या शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची रक्तदाब, मधुमेह, ईसीजी आदी महत्त्वपूर्ण तपासण्या करण्यात आल्या. सूत्रसंचालन पत्रकार दत्ताजी जगताप यांनी केले.

या प्रेरणादायी उपक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर, तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी, दत्ताजी जगताप, विजय उंडे, सारंग साळवे, गणेश कांबळे, किशोर मचे, गायत्री ढवळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.