श्रीगोंदा | दि. ०५ जानेवारी २०२६
गणेश कविटकर,
महाराजा जिवाजिराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
स्थानिक युवकांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करून त्यांना उद्योगजगतात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराजा जिवाजिराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमास विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती तसेच नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात शिवांश मशरूम फार्मचे संचालक श्री. सचिन पोपट रोही यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना उद्योगविश्वाची दिशा दाखवली. “आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग, स्टार्टअप आणि स्वयंरोजगाराकडे वळणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी मांडले.
मार्गदर्शन करताना त्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, योग्य व्यवसाय नियोजन, भांडवल उभारणीचे मार्ग, शासकीय योजना, कर्ज सुविधा तसेच बाजारपेठेतील संधी यांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः स्टार्टअप संकल्पना, डिजिटल मार्केटिंग, स्थानिक उद्योगांना चालना देणे आणि नवकल्पनांचे महत्त्व यावर त्यांनी भर दिला.
समुपदेशन सत्रादरम्यान सहभागी युवक-युवतींच्या शंका व समस्यांचे निरसन करण्यात आले. अनेकांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी यशस्वी उद्योजकांनीही आपले अनुभव सांगत, अपयशाला घाबरू नका तर त्यातून शिकण्याचा सल्ला दिला.
आयोजकांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळते. भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर नवउद्योजक घडण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. हरिभाऊ वाघीरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाशजी साळवे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. राहुल गायकवाड, प्रा. अनिल ढवळे, प्रा. ठवाळ, प्रा. फटे, श्री. बाळासाहेब राऊत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राजाराम कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
