श्रीगोंदा | दि. १५ एप्रिल 2026
गणेश कविटकर
श्रीगोंदा शहरातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. १५ एप्रिल) पासून श्रीगोंदा नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली असून हे आंदोलन सतीश बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
आंदोलनातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :
शनि चौक ते जोधपूर मारुती चौक रस्त्यावरील गटार लाईन व रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करणे, शहरातील धूळ, कचरा व साचलेले पाणी यावर प्रभावी उपाययोजना करून स्वच्छता सुधारणे, नगरपरिषदेकडून माहिती मागूनही योग्य प्रतिसाद न मिळणे व प्रशासनाची टाळाटाळ थांबवणे, नगरपरिषद सभांचे फेसबुक/यूट्यूबवर अधिकृत थेट प्रक्षेपण (लाईव्ह) सुरू करणे, बायपास रस्त्यालगत नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी उपाययोजना व सरस्वती नदी परिसर स्वच्छ करणे, शाळांसाठी मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून इमारत दुरुस्ती/बांधकाम तातडीने करणे, शहरातील अनधिकृत फ्लेक्स होर्डिंगवर कारवाई करून नियोजनबद्ध व्यवस्था निर्माण करणे या मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
विशेष म्हणजे, या आंदोलनाला शिंदे गटातील नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
