शिवदुर्गकडून शिंदे घराण्यातील समाधी स्थळांची स्वच्छता….. सरत्या वर्षाला निरोप देताना सलग चौथ्या वर्षी वारसा संवर्धनाचा जागर

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या तीरावर वसलेल्या मैनाबाई माळावर असलेल्या शिंदे घराण्यातील ऐतिहासिक छत्री व समाधी स्थळांची शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देताना सलग चौथ्या वर्षी ही वारसा स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली.

महाराष्ट्रातील गडकिल्ले, बारव, समाधी स्थळे व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेचा राज्यभर नावलौकिक आहे. शिवदुर्ग संचलित वारसा संवर्धन समितीच्या सदस्यांनी ही ६० वी वारसा स्वच्छता व संवर्धन मोहीम श्रीगोंदा शहरातील मैनाबाईचा माळ येथे यशस्वीपणे राबवली.

श्रीगोंदा ही शिंदे सरदारांची पहिली राजधानी असून पानिपत वीरांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. येथे राणोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, मैनाबाई शिंदे, सखूबाई शिंदे व भागीरथीवाई शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा आजही अस्तित्वात आहे. या सर्वांच्या छत्री व समाधी स्थळांना मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र, हा मौल्यवान वारसा दुर्लक्षित अवस्थेत होता.

या मोहिमेदरम्यान एकूण नऊ शिंदेशाही छत्री व समाधी स्थळांची साफसफाई करण्यात आली. समाधी परिसरात वाढलेली काटेरी झुडपे, लहान झाडे, गवत, मातीची धूळ व साचलेला कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. ही मोहीम शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे मोहिम प्रमुख दिगंबर भुजबळ, उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, गडकिल्ले शतकवीर मारूती वागसकर, जालिंदर पाडळे, निरज पाडळे, बाळासाहेब कांडेकर आदींनी सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना अध्यक्ष राजेश इंगळे म्हणाले,

“श्रीगोंदा शहरातील मैनाबाई माळ येथे असलेल्या सरदार शिंदे घराण्यातील छत्री व पानिपत वीरांच्या समाधी स्थळांची स्वच्छता करून आम्हाला समाधान व अभिमान वाटतो. ही समाधी स्थळे म्हणजे श्रीगोंद्याचा जिवंत इतिहास आहे. हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीसाठी जतन करणे ही आमची जबाबदारी असून, म्हणूनच आम्ही दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना येथे स्वच्छता मोहीम राबवत असतो.”

शिवदुर्गच्या या उपक्रमामुळे श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक वारशाकडे नव्या पिढीचे लक्ष वेधले जात असून, इतिहास जतनासाठी स्वयंसेवी संस्थांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण या मोहिमेतून समोर आले आहे.

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)