श्रीगोंदा | दि 09 एप्रिल 2026
गणेश कविटकर
इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांपैकी धर्मवीर गडाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत काष्टी येथील सुनील दरेकर यांची कन्या काजल दरेकर- जंजिरे हिने सादर केलेल्या संशोधनपत्रामुळे या गडाचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे.
काजल दरेकर यांनी ‘वेळ, प्रदेश आणि भूभाग’ या विषयाअंतर्गत पेडगाव येथील धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वारशाचा सखोल अभ्यास मांडला. त्यांच्या संशोधनात गडाची स्थापत्य रचना, त्याचे रणनीतिक महत्त्व, तसेच स्थानिक परंपरा व लोकजीवनावर झालेला प्रभाव यांची तपशीलवार मांडणी करण्यात आली.
धर्मवीर गडावरील शिवमंदिर, पाण्याची मोट व त्याची स्थापत्यशैली यावर प्रकाश टाकताना त्यांनी गडाच्या वैभवशाली इतिहासाची प्रभावी मांडणी केली. याचबरोबर, औरंगजेबाच्या काळात दक्षिणेवरील नियंत्रणासाठी या गडाचा वापर कसा करण्यात आला, याचाही उल्लेख त्यांनी आपल्या अभ्यासात केला.
या सादरीकरणामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समृद्ध वारशाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरत असून, भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसारासाठीही हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
तरुण पिढीने आपल्या मातीतल्या इतिहासाचा अभ्यास करून तो जगासमोर मांडावा, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. काजल दरेकर यांच्या या यशामुळे श्रीगोंदा तालुक्याचे नाव उंचावले असून, अनेक तरुणांना इतिहास संशोधनासाठी प्रेरणा मिळणार आहे.
