डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीगोंदा  | दि. 15 एप्रिल 2026

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा शहरात काल १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील आंबेडकर भवन येथे सकाळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार विक्रम पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार यांच्यासह सर्व नगरसेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी स्मारकाबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी यापूर्वीच एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, मात्र जागा निश्चित नसल्यामुळे काम रखडले आहे. आता स्थानिक सर्वांनी एकत्र येत योग्य जागा निश्चित करावी, जेणेकरून मंजूर निधी परत जाणार नाही आणि त्याचा योग्य विनियोग करून भव्य स्मारक उभारता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अभिवादन कार्यक्रमानंतर आंबेडकर भवन परिसरात मुलींनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने वातावरण भारावून गेले. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भीम अनुयायांसह तरुणाई, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बँजोच्या तालावर भीमगीतांचा जल्लोष, तसेच “जय भीम”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. मिरवणूक सिद्धार्थनगर येथून सुरू होऊन विजय चौक, संत रोहिदास चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे शनी चौकापर्यंत काढण्यात आली.

या जयंती उत्सवात सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि शहरात एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.