श्रीगोंदा तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी विधानसभेत जोरदार मागणी

मुंबई | दि 24 मार्च 2026

गणेश कविटकर

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्तावावर बोलताना श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या पर्यटन विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले. तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या प्रचंड क्षमतेचा योग्य वापर करून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पेडगाव येथील श्री धर्मवीर गडाच्या विकासाचा विशेष उल्लेख करत, या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी त्यांनी केली. या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था आणि माहिती केंद्र यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, श्रीगोंदा तालुक्यातील विविध धार्मिक स्थळे, परंपरा आणि कृषी पर्यटनाच्या संधींचा एकत्रित विकास केल्यास हा तालुका राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शासनाने यासाठी ठोस धोरण आखून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत श्रीगोंदा तालुक्याच्या पर्यटन विकासाला गती देण्याचे आवाहन त्यांनी सभागृहात केले.