श्रीगोंदा | दि. 20 एप्रिल 2026
गणेश कविटकर
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने किल्ले धर्मवीरगडावर १०१ वी गडकोट मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात प्रथमच “हेरिटेज वॉक” या अभिनव संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या वॉकमध्ये दौंड, श्रीगोंदा, शिरूर आदी तालुक्यांमधील सुमारे ५० इतिहासप्रेमींनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमातून “हेरिटेज वॉक म्हणजे वारसा संवर्धनासाठी पडलेले पुढचे पाऊल” हा संदेश देण्यात आला. अध्यक्ष राजेश इंगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जसे नागरिक आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करतात, तसेच आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी हेरिटेज वॉक ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागात ही संकल्पना रुजविणे आव्हानात्मक असले, तरी शिवदुर्गने घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
धर्मवीरगड हा केवळ शौर्यस्तंभापुरता मर्यादित नसून, पेडगाव परिसरातील अनेक अपरिचित ऐतिहासिक ठेव्यांचा खजिना आहे, याची जाणीव या मोहिमेतून झाली. सहभागींसाठी खंडोबाचा माळ, शंभूराजांच्या इतिहासाशी निगडित परिसर, सरस्वती नदीवरील भव्य हत्तीमोट, भवानी, भैरवनाथ, रामेश्वर, लक्ष्मी-नारायण व मल्लिकार्जुन मंदिर, राजसदर, राजदरबार, तसेच भीमा नदीचे पात्र अशा विविध ऐतिहासिक स्थळांची अभ्यासपूर्ण भटकंती घडवून आणण्यात आली.
या वेळी शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी प्रत्येक स्थळाचा ऐतिहासिक संदर्भासहित सखोल अभ्यास उलगडून सांगत श्रीगोंद्याच्या इतिहासातील गहाळ पानांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. शिवव्याख्याते लक्ष्मण नाईकवाडी व पुरातन विभागाचे मच्छिंद्र पंडित यांनीही मार्गदर्शन करून मोहिमेला वैचारिक बळ दिले.
घारगाव टीमच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर यांच्यासह तुषार चौधरी, चेतन चौधरी, अजित दळवी, अशोक गदादे, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, जालिंदर पाडळे, ईश्वर कोठारे, रहीम हवालदार, संभाजी चौधरी, उत्तम कुलांगे, राकेश अग्रवाल, संतोष रोकडे, शितल गदादे, सुचित्रा दळवी, स्वाती मुळे, निरज पाडळे, आविष्कार इंगळे यांसह महिला व बालमावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.
या “हेरिटेज वॉक”मुळे श्रीगोंदा तालुक्यात वारसा जतन आणि इतिहास जागृतीची नवी चळवळ उभी राहण्याची चिन्हे दिसत असून, भविष्यात अशा उपक्रमांमधून स्थानिक इतिहासाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
