ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत २४ मे शेतकऱ्यांनी तातडीने करा नोंदणी – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे स्पष्ट आवाहन; नोंदणी न केल्यास योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता

अहिल्यानगर, दि. ८ एप्रिल 2026

गणेश कविटकर

 

उन्हाळी हंगाम २०२५–२०२६ साठी राज्यात ई-पीक पाहणी मोहिमेला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे केली जाणारी ही नोंदणी भविष्यातील शासकीय मदत आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. प्रशासनाने यासाठी स्पष्ट इशारा दिला आहे की, वेळेत नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील आणि ती नंतर भरता येणार नाही.

यामुळे अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटांच्या वेळी मिळणारी आर्थिक मदत, पीक विमा आणि विविध शासकीय अनुदानापासून शेतकरी वंचित राहू शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ औपचारिक नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत शेतकरी स्वतः मोबाईलद्वारे नोंदणी करतील, तर दुसऱ्या टप्प्यात २५ मे ते ८ जुलै २०२६ दरम्यान सहाय्यक स्तरावर तपासणी आणि पूर्तता केली जाणार आहे.

उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच सध्या पड असलेल्या जमिनींचीही नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी वेळ न दवडता ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी पुन्हा एकदा केले आहे.