शिवदुर्गचा शतक महोत्सव : सह्याद्रीत गाजले शिवकार्याचे अद्वितीय पर्व

श्रीगोंदा | दि. 08 एप्रिल 2026

गणेश कविटकर

 

सह्याद्रीच्या कड्याकपारीत दडलेल्या इतिहासाला स्पर्श करत, तरुणाईच्या खांद्यावर शिवकार्याची पताका उंचावणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने गडकिल्ले भटकंतीच्या क्षेत्रात एक अभिमानास्पद मैलाचा दगड गाठला आहे. १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण ट्रेकिंग मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याच्या निमित्ताने पिकनिक पॉइंट, श्रीगोंदा येथे भव्य शतक महोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.

२०१८ साली किल्ले धर्मवीरगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यस्तंभास मानवंदना देत या मोहिमेची सुरुवात झाली होती. तब्बल आठ वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर १५ मार्च २०२६ रोजी किल्ले शिवनेरी येथे १०० गडकोटांच्या अभ्यासपूर्ण भटकंतीचा मानाचा टप्पा गाठत संस्थेने इतिहासात नोंद केली.

या सोहळ्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगराध्यक्षा सुनिता खेतमाळीस, नगरसेवक एम. डी. शिंदे, चांदणी खेतमाळीस, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर, डॉ. संदीप मोटे, उद्योजक गणेश होळकर, राजू उकांडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत शिंदे, शिवव्याख्याते लक्ष्मण नाईकवडी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याला दाद दिली.

कार्यक्रमात प्रतिभा इथापे यांनी साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, तर शिवव्याख्याते योगेश मांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि आजच्या पिढीची जबाबदारी यावर प्रभावी भाष्य करून उपस्थितांना प्रेरित केले.

डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्षस्थान ॲड. गोरख कडूस यांनी भूषविले. सूत्रसंचालन मारुती वागस्कर व प्रा. भरत खोमणे यांनी केले, तर आभार दिगंबर भुजबळ यांनी मानले.

शिवकार्याचा प्रेरणादायी प्रवास

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने २९५१ दिवसांच्या कालावधीत ५४५१ सदस्यांच्या सहभागातून १२ युनेस्को मानांकित जागतिक वारसा किल्ल्यांना भेट दिली. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील १०० किल्ल्यांवर १०० वेळा गडपूजन व महाराष्ट्र गीत गायन करताना गडसंवर्धनाची जाणीव जागवली. तसेच गडांवरील ७५० गोण्या प्लास्टिक संकलित करून पर्यावरण संवर्धनाचे भानही जपले.

स्वतःची नियमावली आणि आचारसंहिता ठरवत ट्रेकिंग क्षेत्रात एक आदर्श निर्माण करणाऱ्या या संस्थेने गडकिल्ले, वारसा जतन व बारव संवर्धन क्षेत्रात मोठी तरुणाईची फळी उभी केली आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारचे व्यापक आणि सातत्यपूर्ण शिवकार्य उभे करणारी ही पहिलीच संस्था ठरल्याचे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी काढले.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील शेकडो शिवप्रेमी, महिला, पुरुष व लहान मावळ्यांची उपस्थिती लाभली. आठ वर्षांच्या कार्याचा भव्य चित्रप्रदर्शनातून आढावा सादर करण्यात आला.

शिवदुर्ग संचालक मंडळ, महाराष्ट्र बारव मोहिम आणि शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या सदस्यांनी या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

शिवदुर्गचा हा शतक महोत्सव केवळ एक सोहळा नव्हे, तर नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा, संस्कृतीचे संवर्धन करणारा आणि ‘शिवविचार’ जागवणारा एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरला आहे.