सात गावांच्या एकजुटीतून उभा राहिला नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार; थेरगावचा २८२ वर्षांपूर्वीचा शिलालेख इतिहास उजागर करतो

दि. 12 जून 2026 गणेश कविटकर

 

कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 7

 

थेरगाव, ता. कर्जत (प्रतिनिधी) : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा आणि मराठाकालीन ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात आढळून आला आहे. तब्बल २८२ वर्षांपूर्वी सात गावांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद या शिलालेखात असून, धार्मिक कार्यासाठी ग्रामीण समाजाची सामूहिक बांधिलकी दर्शविणारे हे दुर्मीळ उदाहरण मानले जात आहे.

नाग नदीच्या तीरावर वसलेल्या श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर कोरलेला हा शिलालेख मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत असून एकूण १४ ओळींचा आहे. अनेक वर्षांच्या वातावरणीय परिणामांमुळे आणि वारंवार झालेल्या रंगरंगोटीमुळे अक्षरे काही प्रमाणात अस्पष्ट झाली असली तरी छाप घेतल्यानंतर त्यावरील मजकूर वाचण्यात यश आले आहे.

शिलालेखानुसार शालिवाहन शक १६६६, रक्ताक्षी नाम संवत्सर, अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर १७४४ रोजी माणको अनंत एकबोटे या थेरगावच्या जोशी-कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासह चांदे, खांडवी, रवळगाव, कोकणगाव, थिटे सांगवी, चिंचोली, मांदळी आणि नागमठाणे या गावांतील ग्रामस्थ तसेच जोशी-कुलकर्णी वर्गाने एकत्रितपणे श्री नागनाथ (नागेश्वर) मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केल्याची नोंद या लेखात करण्यात आली आहे.

इतिहास संशोधकांच्या मते, हा शिलालेख केवळ मंदिर दुरुस्तीची नोंद नसून मराठाकालीन गावव्यवस्था, वतनदारी पद्धती, धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक प्रशासन यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सात गावांनी सामूहिक सहभाग नोंदविल्याचे उदाहरण अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

शिलालेखात माणको अनंत एकबोटे यांचा जोशी व कुलकर्णी म्हणून उल्लेख आहे. कुलकर्णी हे महसूल आणि लेखन व्यवस्थेचे प्रमुख अधिकारी तर जोशी हे धार्मिक व पंचांगविषयक कार्य पाहणारे अधिकारी होते. या दोन्ही वतनदार पदाधिकाऱ्यांनी धार्मिक कार्यात घेतलेला पुढाकार त्या काळातील सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतो.

या शिलालेखामुळे अठराव्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक एकात्मता, धार्मिक संस्थांप्रती असलेली निष्ठा आणि स्थानिक नेतृत्वाची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित होते. मंदिरांच्या उभारणी व संवर्धनासाठी केवळ राजसत्तेवर अवलंबून न राहता स्थानिक समाज, वतनदार आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

स्थानिक इतिहास, भूगोल, वतनदारी व्यवस्था आणि मराठाकालीन प्रशासनाच्या अभ्यासासाठी हा शिलालेख अत्यंत मौल्यवान ठरत असून भविष्यातील संशोधकांसाठी तो एक विश्वासार्ह प्राथमिक ऐतिहासिक स्रोत मानला जात आहे.

शिलालेखाचे संशोधन राजेश पोपट इंगळे यांनी केले असून वाचन अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. या संशोधन कार्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचालित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे राजेश इंगळे, दिगंबर भुजबळ, प्रा. कानिफ उगले, सरपंच अनिल शिंदे, माजी सरपंच मिनीनाथ शिंदे, रवींद्र महानवर, गोरख शिंदे, किरण शिंदे, आबुनाना नन्नवरे आणि ग्रामविकास अधिकारी महेश जगताप यांचे सहकार्य लाभले.

 

“थेरगावचा शिलालेख म्हणजे मराठाकालीन मंदिरसंवर्धन, जोशी-कुलकर्णी वतनव्यवस्था, बहुग्रामीय प्रशासन आणि स्थानिक समाजाच्या धार्मिक सहभागाचा जिवंत पुरावा आहे. हा शिलालेख अठराव्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्राचे सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय वास्तव समोर आणतो.”

– अनिल दुधाणे, शिलालेख वाचक, पुणे