पानिपतचे ‘रोड मराठे’ महाराष्ट्र दौऱ्यावर : इतिहासाच्या नात्यांचा पुनर्जागरण सोहळा

श्रीगोंदा | दि. 01 मे 2026

गणेश कविटकर

इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेले तिसरे पानिपत युद्ध आजही मराठी मनात अभिमान आणि वेदनेची जाणीव जागवते. १७६१ साली झालेल्या या महायुद्धात महाराष्ट्रातून गेलेल्या लाखो मराठा वीरांनी यमुनेच्या काठावर पराक्रमाची परमोच्च सीमा गाठली. या रणांगणात अनेक वीर कधीच मायभूमीत परतले नाहीत, पण त्यांनी जपलेली शौर्यपरंपरा आजही त्यांच्या वंशजांच्या रूपाने जिवंत आहे.

या ऐतिहासिक वारशाचा धागा पुन्हा दृढ करण्यासाठी हरियाणातील अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे ‘रोड मराठे’ महाराष्ट्र दौऱ्यावर रवाना झाले आहेत. “पानिपत–महाराष्ट्र संपर्क अभियान” या उपक्रमांतर्गत ही यात्रा इतिहास, नाते आणि संस्कृती यांचे पुनर्मिलन घडवून आणणारी ठरत आहे.

पानिपतच्या युद्धानंतर जीव वाचवून परतलेल्या मराठ्यांची काही तुकडी हरियाणातील पानिपत परिसरातच स्थायिक झाली. आज त्यांचे वंशज ‘रोड मराठे’ म्हणून ओळखले जातात. आपल्या पूर्वजांची मातृभूमी पुन्हा अनुभवण्यासाठी आणि बंधुत्वाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी हे वंशज आता महाराष्ट्रात येत आहेत, ही बाब अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे.

या यात्रेची सुरुवात जळगाव येथून होणार असून जळगाव, धुळे, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीगोंदा, मंचर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी भेटी देत ‘रोड मराठ्यांच्या’ इतिहासाची जनजागृती केली जाणार आहे.

या प्रतिनिधीमंडळात संस्थापक सदस्य मराठा राजेश कल्याण, मराठा कृषीपाल कसबरे, भागासिंग बाळदे, सुरजीत महाले, कृष्णा कल्याण तसेच राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांचा समावेश आहे.

५ मे रोजी श्रीगोंद्यात आगमन

दिनांक ५ मे रोजी ही टीम श्रीगोंदा शहरात दाखल होणार असून दिल्ली वेससह पानिपत वारसा स्मारकांना भेट देणार आहे. तसेच शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन च्या सदस्यांशी संवाद साधत इतिहासाच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. म्हातार पिंप्री येथील सरदार जानराव वाबळे यांच्या समाधीस्थळालाही भेट देण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक आणि भावनिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले आहे.

इतिहासाशी नाळ जोडणारा प्रेरणादायी प्रवास

पानिपतच्या रणभूमीवर रक्त सांडणाऱ्या मराठा वीरांचे वंशज आज पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत पाऊल ठेवत आहेत, ही केवळ एक भेट नसून इतिहासाशी नाळ जोडणारा, बंधुत्व जागवणारा आणि प्रेरणा देणारा प्रवास आहे.

ही यात्रा मराठा शौर्य, त्याग आणि एकात्मतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ठरणार आहे.