शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

श्रीगोंदा | दि. 05 मार्च 2026

गणेश कविटकर

शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करून मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक बाजीराव भोसले (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रुपेश अशोक पवार (रा. कानमंडले ता. चांदवड, जि. नाशिक) याने स्वामी बाळासाहेब पिसे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून “रुपेश पवार फाउंडेशन”च्या नावाने शासकीय सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी श्रीगोंदा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तब्बल ७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, आरोपी मुंबई येथे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास पथकाला शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. आरोपी तपास पथकाला चकवा देत होता, मात्र त्याच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी त्याला अखेर कानमंडले (ता. चांदवड, जि. नाशिक) येथून ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मुम्मका सुदर्शन , अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पो.ना. गहिनीनाथ यादव, पो.कॉ. संदीप राऊत , महादेव कोहक , सचिन वारे, अरुण पवार, विवेक दळवी तसेच दक्षिण मोबाइल पथकातील राहुल गुंड यांचा समावेश होता.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश आहिरे व पोलीस नाईक गणेश गाडे करीत आहेत.