चारित्र्याच्या संशयातून अल्पवयीन मुलीचा खून; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पिता-पुत्र अटकेत

श्रीगोंदा दि. 17 जून 2026

 

श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यालगतच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून, खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा) याचे मयत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दि. १५ जून रोजी दुपारी त्यांच्या दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात शुभम ओव्हाळ याने लोखंडी रॉड व फरशीच्या साहाय्याने मुलीवर हल्ला करून तिच्या डोक्यात गंभीर दुखापत केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला.

खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातच ठेवला आणि केडगाव (अहिल्यानगर) येथे राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपी व त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ हे श्रीगोंद्यात आले. त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडाळी रोडवरील जंगल परिसरात नेला. तेथे लाकडे गोळा करून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गु.र.नं. ६१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३(५), २३८ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ३, ४ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पडताळणी केली. पहाटे वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी शुभम ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे करीत आहेत.

“माझ्या मुलीला न्याय द्या” – आईचा आक्रोश

मुलीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मयत तरुणीच्या आईने एकच हंबरडा फोडला. “माझ्या मुलीचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. तिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा,” अशी भावनिक मागणी त्यांनी केली. आईच्या या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गणेश अहिरे, पोउनि. सचिन लिमकर, पोउनि. प्रवीण पाटील तसेच श्रीगोंदा व कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

“अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येनंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.”