CMIS नोंदणीत श्रीगोंदा पोलीस ठाणे जिल्ह्यात अव्वल

७,७१९ आरोपींची नोंदणी; गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा प्रभावी वापर

 

श्रीगोंदा | दि. ०४ ऑगस्ट २०२६

गणेश कविटकर

 

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत श्रीगोंदा पोलीस ठाण्याने Criminal Monitoring Intelligence System (CMIS) पोर्टलवर तब्बल ७ हजार ७१९ आरोपींची नोंदणी पूर्ण केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आरोपींची नोंदणी करणारे श्रीगोंदा पोलीस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. सदर CMIS फिडींग 15 जुलै पासुन करण्यात आलेले आहे.

गुन्हेगार आणि आरोपींची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, सराईत व फरार आरोपींवर प्रभावी नजर ठेवता यावी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई अधिक गतिमान करता यावी, या उद्देशाने CMIS प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे एखाद्या आरोपीवर कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर अटक किंवा प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे का, तसेच संबंधित आरोपीची ओळख असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती यांसह विविध बाबी तत्काळ उपलब्ध होणार आहेत.

CMISच्या माध्यमातून डिजिटल क्रिमिनल अल्बम, पाहिजे, तडीपार व फरार आरोपींची माहिती, प्रभावी गस्त व रात्रगस्तीसाठी आवश्यक माहिती तसेच आरोपींचे अद्ययावत वर्गीकरण उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, श्रीगोंदा हद्दीत राहून इतर ठिकाणी गुन्हे करणारे तसेच बाहेरून श्रीगोंदा हद्दीत येऊन गुन्हे करणारे आरोपी यांची स्वतंत्र माहिती उपलब्ध झाल्याने पोलिसांच्या तपासाला आणि प्रतिबंधात्मक कारवाईला अधिक अचूक दिशा मिळणार आहे.

आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, संभाव्य गुन्हे रोखणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ही डिजिटल यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे केवळ आरोपींची नोंदणी न राहता, गुन्हेगारी प्रतिबंधासाठी माहितीचे प्रभावी विश्लेषण आणि तातडीची कारवाई करण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे.

ही मोहीम अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या देखरेखीखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेत CMIS नोंदणीचे हे उद्दिष्ट पूर्ण केले.

तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने श्रीगोंदा पोलिसांची ही कामगिरी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, आगामी काळात या डिजिटल यंत्रणेचा प्रत्यक्ष पोलिसिंगमध्ये कितपत प्रभावी वापर होतो, याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

 

“गुन्हेगारी नियंत्रणासाठी CMIS ठरणार प्रभावी साधन”

 

“CMIS प्रणालीमुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच इतर ठिकाणच्या आरोपींची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. सराईत, फरार, पाहिजे व तडीपार आरोपींच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यास या प्रणालीची मोठी मदत होईल. आरोपींचे अचूक वर्गीकरण झाल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई, गस्त आणि गुन्हे प्रतिबंधाच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविता येतील. श्रीगोंदा पोलीस ठाणे CMIS नोंदणीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आले ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. मात्र, ही केवळ नोंदणीची कामगिरी नसून भविष्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी या माहितीचा प्रभावी वापर करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे वचक निर्माण करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस सातत्याने प्रयत्नशील राहतील.”

– पोलीस निरीक्षक संजय ठेंगे