श्रीगोंद्यात अलिशान कारमधून गुटखा वाहतूक; चौघांवर कारवाई, २८.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी शिवारात अलिशान कारमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चौघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यातील गुटखा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील काही संशयित अद्याप फरार आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मुंढेकरवाडी येथील अमोल जाधव याने विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा केला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमोल जाधव यांच्या राहत्या घराजवळ सापळा रचला.

यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून गुटख्याच्या गोण्या दुसऱ्या स्विफ्ट कारमध्ये भरल्या जात असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करून पोलिसांनी अमोल रामदास जाधव (वय ३५, रा. मुंढेकरवाडी ), अनिल रतन कुरुमकर (वय ४३, रा. मुंढेकरवाडी) आणि फरहान रेहमान बेपारी (वय २३, रा. बुरुड गल्ली, श्रीगोंदा) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत अमोल जाधव याने हा व्यवसाय दीपक लोखंडे (रा. लोखंडेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्यासोबत भागीदारीत चालवत असल्याची कबुली दिली. तसेच हा माल जत (जि. सांगली) येथील ‘अप्पू’ व ‘माजीद’ (पूर्ण नावे अज्ञात, दोघेही फरार) यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. तर फरहान बेपारी याने शोएब राजू तांबोळी (रा. बुरुड गल्ली, श्रीगोंदा) याच्या सांगण्यावरून हा माल विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा आरएमडी, विमल पान मसाला व व्ही-१ सुगंधी तंबाखू, २२ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी (अल्काझार व स्विफ्ट) गाड्या, ३० हजार १३० रुपयांची रोकड तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोहन साखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, मनोज साखरे, प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.

जतमार्गे श्रीगोंद्यात गुटख्याचा पुरवठा

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला गुटखा जत (जि. सांगली) येथून आणल्याचे उघड झाले आहे. जत तालुका हा कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्याने, कर्नाटकातून गुटखा जतमार्गे श्रीगोंदा तालुक्यात पोहोचविला जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

गाडी पोहोचताच पोलिसांचा सापळा

स्थानिक गुन्हे शाखेला संबंधित वाहनाच्या हालचालींची पूर्वकल्पना मिळाली होती. पांढऱ्या रंगाच्या अल्काझार कारमधून गुटखा स्विफ्ट कारमध्ये उतरविण्याचे काम सुरू असतानाच पोलिसांनी अचानक छापा टाकत कारवाई केली आणि संपूर्ण साठा जप्त केला. त्यामुळे गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.