ढवळगाव शिवारात गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

श्रीगोंदा | दि. 21 जून 2026

गणेश कविटकर

 

बेलवंडी पोलिसांनी ढवळगाव शिवारात धाडसी कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ढवळगाव येथील हॉटेल रिलॅक्स परिसरात काही व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना ताब्यात घेतले.

अंगझडतीदरम्यान सचिन विलास शिंदे (वय ३५, रा. निंबवी, ता. श्रीगोंदा) याच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा, तर दीपक सिताराम शिंदे (रा. ढवळगाव) याच्याकडे दोन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत त्यांनी हे शस्त्र तुषार तांबे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली.

याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमाच्या कलम ३, ७, २५ व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, संदीप गवारे, भाऊसाहेब शिंदे, हसन शेख, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलिस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर व विकास सोनवणे यांनी सहभाग घेतला.