वडिलांच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात राबणाऱ्या २५ वर्षीय लेकराला विजेने हिरावले

अचानक आलेल्या पावसात घडली हृदयद्रावक घटना; घोडेगाव परिसरात शोककळा

 

श्रीगोंदा , दि. २२ जून 20206

गणेश कविटकर

 

ज्याच्या खांद्यावर भविष्यात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, जो वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबत होता, त्या २५ वर्षीय तरुणाला काळाने अक्षरशः क्षणार्धात हिरावून नेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना आज घोडेगाव येथे घडली. अभिषेक रूपचंद दरेकर या तरुणाचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून दरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी दुपारी अभिषेक आपल्या वडिलांसोबत शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करत होता. आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. निसर्गाचा हा रौद्र अवतार काही क्षणांतच अभिषेकच्या आयुष्यावर काळा पडदा टाकणार आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती.

दुपारी पावणेतीनच्या सुमारास अचानक कडाडत आलेली भीषण वीज थेट अभिषेकच्या अंगावर कोसळली. त्या क्षणी झालेला प्रचंड आवाज आणि त्यानंतरचे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. विजेचा तीव्र आघात अभिषेकच्या गालावरून, छातीवरून आणि पायातून जात जमिनीत उतरला. काही क्षणांतच तो गंभीररीत्या भाजला गेला.

स्वतःच्या लेकराला डोळ्यादेखत अशा अवस्थेत पडलेले पाहून वडिलांनी आक्रोश केला. ज्या मुलासोबत काही क्षणांपूर्वी ते शेतात राबत होते, तोच मुलगा त्यांच्या समोर मृत्यूशी झुंज देत होता. उपस्थितांनी तातडीने अभिषेकला श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अभिषेक हा मेहनती, नम्र आणि कुटुंबवत्सल तरुण म्हणून परिसरात ओळखला जात होता. घरची जबाबदारी सांभाळत शेतीत वडिलांना मदत करणारा हा तरुण अनेकांच्या आशेचा किरण होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे.

एका क्षणात सर्व काही संपले वडिलांच्या हाताला धरून शेतात काम करणारा मुलगा कायमचा निघून गेला. दरेकर कुटुंबाच्या आक्रोशाने संपूर्ण गावाचे डोळे पाणावले असून घोडेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या एका विजेच्या कडकडाटाने एका कुटुंबाचा आधार हिरावून नेला आणि अनेक स्वप्नांना कायमचा विराम दिला.