महेश्वर मल्टीस्टेटचा विश्वासाचा प्रवास; १७ शाखांमधून ३४० कोटी ठेवींचा टप्पा — प्रा. राम शिंदे

विसापूर : दि. 25 मे 2026

गणेश कविटकर

“दत्तात्रय गावडे गुरुजींनी शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर महेश्वर पतसंस्था व मल्टीस्टेटचे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून संस्थेने १७ शाखांचा विस्तार करत तब्बल ३४० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी विश्वासपात्र आणि सर्वसामान्यांच्या हिताची आहे,” असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काढले.

विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या नूतन शाखा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. प्रारंभी प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, “महेश्वरच्या व्यासपीठावर श्रीगोंद्यातील सर्व पक्षांचे कारभारी उपस्थित आहेत, हीच दत्तात्रय गावडे यांच्यावरील विश्वासाची मोहर आहे.” त्यांनी सिस्पे आणि इन्फिनिटी प्रकरणांचा उल्लेख करत, “अलिकडच्या काळात काही पतसंस्थांच्या कामकाजाबाबत नकारात्मक चर्चा होत आहेत. लोकांना हवेत गोळीबार आवडतो; मात्र त्याचे परिणाम अनिष्ट ठरू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करताना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे,” असे आवाहनही केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दीपक भोसले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना ठेवी वाढ, कर्जवसुली आणि शिस्तबद्ध आर्थिक नियोजन यामुळे महेश्वर मल्टीस्टेटने ३४० कोटींचा टप्पा पार केल्याचे सांगितले.

यावेळी बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, दिनकर पंधरकर, विष्णू जठार, रमजान हवालदार आदींची भाषणे झाली. तसेच नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राकेश पाचपुते, अनिल पाचपुते, ऋषिकेश शेलार, विठ्ठलराव काकडे, राजेंद्र नलगे, अजिनाथ हजारे आणि विठ्ठलराव वाडगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत महेश्वरचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे आणि प्रसाद गावडे यांनी केले. सूत्रसंचालन रवि पवार व प्रा. शंकर गवते यांनी केले, तर आभार माजी आमदार राहुल जगताप यांनी मानले.