पाण्यासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार…. घारगावात दोन तास रास्ता रोको; आवर्तनाची तारीख जाहीर करण्याची मागणी

धरणे भरलेली, मग शेतकऱ्यांच्या घशाला कोरड का? तलावांवरील पाणी उपसा बंदी कायम असल्याने संतापाचा उद्रेक; राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, प्रशासनाला तीव्र इशारा

 

श्रीगोंदा | दि. 23 ऑक्टोबर 2026

गणेश कविटकर

 

एका बाजूला दुष्काळाने होरपळणारी शेती, दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी कोमेजणाऱ्या फळबागा आणि उभी पिके… डोळ्यांसमोर उभे पीक जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना पाण्याच्या आवर्तनाची तारीख मात्र अद्याप स्पष्ट होत नसल्याने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. पाण्याच्या हक्कासाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली घारगाव येथे नगर-दौंड महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी आणि आक्रमक भूमिकेतून शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह जलसंपदा विभागाचे लक्ष वेधत तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली.

 

धरणे भरलेली, तरी शेतकऱ्यांच्या वाट्याला पाणी कधी ?

तालुक्यातील फळबागा आणि उभी पिके वाचविण्यासाठी पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आवर्तनाचे आश्वासन दिले जात असताना त्याची निश्चित तारीख जाहीर का केली जात नाही? तलावांतील पाणी उपशावरील बंदी कायम ठेवून शेतकऱ्यांनी पिके कशी जगवायची? धरणांमध्ये पाणीसाठा असताना शेतकऱ्यांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ का येते? असे सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योगपतींना द्यायचे आहे का?” असा थेट सवाल शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी उपस्थित केला. पाण्याच्या वाटपाबाबत पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

निवडणुकीच्या चर्चेपेक्षा शेतकऱ्यांचे पीक महत्त्वाचे….

राजेंद्र म्हस्के म्हणाले की, तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाशी झुंज देत असताना राजकीय वर्तुळात निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चांना महत्त्व दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय होताना दिसत नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडणारे आमदार विक्रम पाचपुते यांनी पाण्याच्या आवर्तनाबाबतही स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि आवर्तनाची निश्चित तारीख सांगावी, अशी मागणी त्यांनी केली.

खासदार निलेश लंके यांना निवडून दिल्यानंतर तालुक्याला काय मिळाले, असा सवाल उपस्थित करत म्हस्के यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली. राजकीय पराभवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “शेतकऱ्यांवरील अन्याय आता सहन केला जाणार नाही. तातडीने आवर्तन सोडले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

 

पाण्याची तारीख नाही, शेतकरी संकटात…..

माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत नलगे यांनीही आवर्तनाची तारीख जाहीर होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तलावांतील पाणी उपशावरील बंदी आणि आवर्तनाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे यांनी निवडणुकांसाठी बैठका घेतल्या जातात; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याची टीका केली. पाणीप्रश्नी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

शेतकऱ्यांचा एकच निर्धार, आधी पाणी मग बाकीचे प्रश्न…

या आंदोलनात भास्कर वागस्कर, डॉ. अनिल कोकाटे, एकनाथ बारगुजे, अशोक नवले, बाळासाहेब नलगे, राजेंद्र इधाटे, बापूसाहेब निंभोरे आणि गोरख उंडे यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन डुबल, विश्वास थोरात, लक्ष्मण मचे, रघुनाथ खामकर, तुकाराम कळमकर, आप्पासाहेब शिंदे, सोपान शिंदे, सुभाष दरेकर, महादेव म्हस्के, राजेंद्र पोकळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूषण बडवे यांनी सूत्रसंचालन केले, तर शरद जगताप यांनी आभार मानले.आता प्रश्न केवळ आवर्तनाचा नाही, तर शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांचा आणि जगण्याचा आहे. पाणी वेळेवर मिळाले तरच पिके वाचतील, अन्यथा शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या पिकांचा घास हिरावला जाईल. त्यामुळे प्रशासनाने आश्वासनांपलीकडे जाऊन आवर्तनाची तारीख जाहीर करावी आणि पाणीप्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा, हीच या आंदोलनातून उमटलेली शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे