महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या खेळाडूंची मैदानावर चमकदार कामगिरी

सविता वाळके, सुरेखा मातने यांची सुवर्णभरारी; रिले स्पर्धेतही विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

श्रीगोंदा | दि. 23 ऑक्टोबर 2026

गणेश कविटकर

 

कठोर परिश्रम, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. श्रीरामपूर येथे दि. १८ व १९ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन करून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली.

या स्पर्धेत सविता वाळके हिने भालाफेक आणि गोळाफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी यश मिळविले. सुरेखा मातने हिने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या सहनशक्तीचा आणि जिद्दीचा प्रत्यय दिला. रिद्धी सप्रे हिने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. मुलींच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या संघात समृद्धी सुद्रिक, सुरेखा मातने, रिद्धी सप्रे आणि सविता वाळके यांनी उत्कृष्ट समन्वय व सांघिक भावना दाखवत यश संपादन केले.

मुलांच्या रिले संघानेही मैदानावर आपली छाप पाडली. ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत द्वितीय, तर ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत खेळाडूंनी महाविद्यालयाच्या यशात भर घातली. या संघात तेजस काळे, कृष्णा वायकर, रोहन चव्हाण आणि ऋषिकेश मांडगे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

 

मैदानावरील हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

क्रीडा क्षेत्रातील हे यश केवळ पदकांपुरते मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिस्तीचे, आत्मविश्वासाचे आणि सांघिक भावनेचे प्रतीक आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, हे या खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह श्रीगोंदा परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कामगिरीमुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा माजी आमदार राहुल जगताप, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, उपप्राचार्य तथा जिमखाना विभागप्रमुख डॉ. नितीन थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, डॉ. राजाराम कानडे, डॉ. राहुल गायकवाड, डॉ. अनिल ढवळे, प्रा. संजय फटे यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ यांचे मार्गदर्शन लाभले. जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठता येतात, हे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.