श्रीगोंदा –
संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचा चिमुकला पण जिद्दी खेळाडू ओंकार गोरे याने पुन्हा एकदा आपली क्रीडाक्षमता सिद्ध करत राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी भक्कम निवड मिळवली आहे. केवळ वेग, कौशल्य आणि सातत्यावर यशाचा मार्ग गाठता येतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ओंकार!
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आणि विमाननगर आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक येथे झालेल्या पुणे विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत ओंकारने भिलोरी कामगिरी करत सुवर्णच ठरले.
११वी–१२वी वयोगटात दमदार खेळी सादर करत ओंकारने सर्वांचे लक्ष वेधले आणि विरार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिकिट पक्के केले. श्रीगोंद्याचे नाव राज्यपातळीवर झळकवणाऱ्या या यशामुळे गावात उत्साह आणि अभिमानाची लहर उमटली आहे.
ओंकारच्या यशामागे संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे अनुभवी प्रशिक्षक जयेश व सिद्धेश आनंदकर, तसेच महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. महेश गिरमकर यांचे मार्गदर्शन विशेष ठरले. योग्य प्रशिक्षण, कष्ट आणि चिकाटीने काय साध्य करता येते, याचा उत्तम नमुना ओंकारने घालून दिला आहे.त्याच्या या कामगिरीबद्दल आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रमसिंह पाटसुले, जेष्ठ नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, प्राचार्य डॉ. सतीश सूर्यवंशी, ग्रॅंडमास्टर संजय आनंदकर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. सचिन हमद्रे, प्रा. सतीश चोरे यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीगोंद्यातून राज्याच्या स्केटिंग पटांगणात झेपावणारा हा तडफदार खेळाडू आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी करून नवे शिखर गाठेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
ओंकारचे यश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून “स्वप्न मोठे असावीत आणि प्रयत्न अखंड असावेत” याचा तो सुंदर संदेश देऊन जात आहे!
ओंकार गोरेची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत धडक प्रवेश श्रीगोंद्याचा नवा क्रीडा मानबिंदू!
