श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष मा. नानासाहेब कोथिंबिरे यांनी आज आपल्या आई-वडिलांच्या हस्ते नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुटुंबाच्या आशीर्वादाने झालेल्या या अर्जामुळे शहरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून अलीकडील जनमत चाचण्यांमध्येही कोथिंबिरे आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही वर्षांत राजकीय व सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत ‘सामान्यांचा माणूस’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या कोथिंबिरे यांनी उपनगराध्यक्षपदावर असताना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आदी मूलभूत सुविधांवर ठोस कामगिरी केली आहे. त्यामुळे युवा वर्ग, व्यावसायिक व नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता वाढली आहे.
अर्ज दाखल करताना ते म्हणाले, “मी भाजपकडून उमेदवारी करण्याचा इच्छुक आहे; मात्र पक्षाचा कोणताही निर्णय मला मान्य आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षनिष्ठा आणि संघटनाप्रतीची बांधिलकी अधोरेखित झाली.
भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी कोथिंबिरे यांचा जनसंपर्क व प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना प्रमुख दावेदार ठरवत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. आगामी काही दिवसांत भाजप उमेदवार जाहीर करणार असल्याने श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत