सहकाराच्या पटावर प्रभाव, निवडणुकीच्या गणितात निर्णायक भूमिका आणि राजकीय वैराची किनार; श्रीगोंदा तालुक्यात चर्चांना उधाण
श्रीगोंदा | दि. ०६ ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दानशूर प्रतिमा, स्थानिक सहकार संस्थांवरील प्रभाव, लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत आणि सेवा सहकारी संस्थेतील राजकीय वर्चस्व तसेच सहकार, साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील त्यांची सक्रिय भूमिका यामुळे नाहाटा यांचा राजकीय प्रभाव तालुक्याच्या सीमा ओलांडून राज्य पातळीपर्यंत पोहोचला.
विद्यार्थीदशेपासून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या राजकीय सहवासात आलेल्या नाहाटा यांनी सुरुवातीच्या काळात पाचपुते यांचे खंदे समर्थक म्हणून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. पुढे त्यांच्या राजकीय शैलीला ‘नाहाटा पॅटर्न’ अशी ओळख मिळाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदामुळे त्यांना तालुक्यात व्यापक राजकीय ओळख मिळाली.
मात्र राजकारणात समीकरणे कायमस्वरूपी नसतात. पुढील काळात नाहाटा यांनी पाचपुते यांच्या राजकीय विरोधकांशीही जवळीक ठेवली. माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव नागवडे, कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय कुंडलिक तात्या जगताप तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांच्याशी त्यांनी राजकीय संबंध ठेवत विविध प्रसंगी मदत केल्याची तालुक्यात चर्चा राहिली. त्यामुळे ‘ज्यांच्याशी मैत्री, त्यांच्यासाठी ताकद आणि ज्यांच्याशी राजकीय संघर्ष, त्यांच्यासाठी आव्हान’ अशी नाहाटा यांच्या राजकारणाची प्रतिमा निर्माण झाली.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या ठराव प्रक्रियेकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मतदार यादीकडे पाहता नाहाटा यांच्याशी उघडपणे किंवा पडद्यामागून राजकीय जवळीक असलेले मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या गणितात त्यांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेच्या काळात नाहाटा यांना तालुक्यात राजकीयदृष्ट्या सक्रिय राहता येऊ नये, यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आता रंगली आहे. मात्र या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
काही दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत राज्य पणन मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दत्ता पानसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारीमागे नाहाटा यांची भूमिका असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे नाहाटा यांचा राजकीय प्रभाव केवळ श्रीगोंदा तालुक्यापुरता मर्यादित नसून सहकाराच्या माध्यमातून राज्य पातळीवरील राजकीय समीकरणांवरही त्यांची नजर असल्याचे मानले जाते.
दरम्यान, नाहाटा यांच्या पुत्र मितेश नाहाटा यांची राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी झालेली नियुक्तीही त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय प्रभावाची चर्चा वाढवणारी ठरली.
‘नाहाटा फॅक्टर’मुळे नेत्यांची धाकधूक?
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात निवडणुकीचे गणित बदलण्याची क्षमता असलेले नेते म्हणून नाहाटा यांच्याकडे पाहिले जाते. कोणत्याही निवडणुकीत मतदारांचे व्यक्तिगत संबंध, सहकारातील समीकरणे आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यांचा मेळ घालण्याची त्यांची शैली त्यांच्या राजकीय ताकदीचा केंद्रबिंदू मानली जाते.
यामुळेच नाहाटा यांच्याशी मैत्री ठेवणारे आणि राजकीय संघर्ष करणारे दोन्ही गट तालुक्यात पाहायला मिळतात. त्यांच्या राजकीय हालचालींवर अनेक नेत्यांचे लक्ष असते. परिणामी नाहाटा यांच्याभोवती निर्माण होणारे प्रत्येक राजकीय संकट हे केवळ कायदेशीर प्रकरण म्हणून न पाहता त्यामागील राजकीय संदर्भ शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो.
अटक कारवाईभोवती राजकीय चर्चांना उधाण
नुकत्याच झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर श्रीगोंदा तालुक्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे की त्यामागे आगामी सहकारी निवडणुकांचे राजकीय गणित दडले आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र या सर्व चर्चांमध्ये एक बाब स्पष्टपणे पुढे येते ती म्हणजे ‘नाहाटा फॅक्टर’ अद्याप श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात प्रभावी आहे.
आरोप, अटक आणि राजकीय चर्चा या स्वतंत्र बाबी असल्या तरी नाहाटा यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहता त्यांच्या भोवती निर्माण झालेले राजकीय वर्तुळ सहज दुर्लक्षित करता येणार नाही. आगामी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाहाटा यांची भूमिका काय राहते, त्यांच्या समर्थक मतदारांची दिशा कोणती असते आणि सध्याच्या घडामोडींचा निवडणुकीच्या गणितावर किती परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
