NEET पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध

श्रीगोंदा | दि.२५ जुलै २०२६

गणेश कविटकर

 

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना, दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार व बळाच्या वापराबाबतही युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरातील आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे आणि नीट परीक्षेतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी श्रीगोंदा तालुका काँग्रेस अध्यक्ष संतोष भोयटे, महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता दरवडे, अॅड. समित बोरुडे, युवक काँग्रेस अध्यक्ष विकास काळे, चेअरमन शहाजी खेडकर, मुजफ्फर मालजप्ते, डॉ. गोरख बायकर, सचिन गायकवाड, संतोष बायकर, सोहेल शेख, प्रवीण ढगे, सूरज शेख, योगेश शेळके, अफ्रिद इनामदार, विलास पाटील नलगे, संतोष नलगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.