बालवयात ५२ किमींची ऐतिहासिक पदभ्रमंती; शिवदुर्गच्या दोन बालमावळ्यांची पन्हाळा-पावनखिंड मोहीम यशस्वी

अवघ्या ८ आणि १० व्या वर्षी चिखल, डोंगर, ओढे तुडवत पावनखिंडीपर्यंत धाव; युवा पिढी घडविणाऱ्या शिवदुर्ग परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

श्रीगोंदा | दि. २६ जुलै २०२६

गणेश कविटकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून इतिहासाची प्रेरणा घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण जागवणारी पन्हाळा-पावनखिंड ५२ किलोमीटरची राज्यस्तरीय पदभ्रमंती शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवारातील दोन चिमुकल्या बालमावळ्यांनी बालवयातच यशस्वीपणे पूर्ण केली. अवघ्या ८ वर्षे १० महिन्यांचा राजवीर संतोष रोकडे आणि १० वर्षे १ महिन्यांचा आदित्य भरत खोमणे यांनी ही अत्यंत खडतर मोहीम पूर्ण करून पावनखिंडीत अभिवादन केले. त्यांच्या या पराक्रमाने उपस्थितांमध्ये कौतुकासोबतच नव्या पिढीच्या जिद्दीची आणि धाडसाची चर्चा रंगली.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने हिल रायडर्स फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या सहकार्याने पन्हाळा-पावनखिंड ५२ किमी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय मोहिमेत तब्बल ७५० मावळ्यांनी सहभाग नोंदवला. शिवदुर्ग परिवारातील महिला रणरागिणी, नियमित ट्रेकर्स, ज्येष्ठ मावळे आणि बालमावळे अशा सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राजवीर रोकडे आणि आदित्य खोमणे हे शिवदुर्ग परिवारासोबत नियमितपणे गडकिल्ले ट्रेकिंग, वारसा संवर्धन आणि बारव जतन मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. याच अनुभवातून त्यांनी बालवयातच पन्हाळा-पावनखिंडीची ५२ किमींची आव्हानात्मक पदभ्रमंती पूर्ण करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे दोन्ही बालमावळे आपल्या वडिलांसोबत या मोहिमेत सहभागी झाले होते.

पावसात धावत होते बालमावळे

पदभ्रमंतीच्या संपूर्ण मार्गावर डोंगर-दऱ्या, चिखल, ओढे आणि पावसाचा सामना करताना या दोन्ही चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही दिसत नव्हता. अनेक ठिकाणी ते धावतच मार्गक्रमण करत होते. त्यांच्या या उत्साहाने आणि ऊर्जेने मोहिमेतील सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी या बालमावळ्यांशी संवाद साधत त्यांचे फोटो घेतले. त्यांच्या जिद्दीकडे पाहताना जणू शिवकालीन मावळ्यांच्या पराक्रमाचीच झलक पाहायला मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

सन्मानपत्रासह रोख बक्षिसाने गौरव

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिल रायडर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजवीर रोकडे आणि आदित्य खोमणे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ‘चांडाळ चौकडी’ वेब सिरीज फेम रामभाऊ जगताप यांनीही दोन्ही बालमावळ्यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना रोख बक्षीस देऊन गौरविले.

पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, डॉ. संदीप पाटील, डॉ. संजय वाघमोरे तसेच मोहिमेतील सर्व सहभागी सहकाऱ्यांनी दोन्ही बालमावळ्यांचे अभिनंदन केले. शिवदुर्ग कार्यालयातही त्यांना मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

सहपरिवार गडकिल्ले सर करण्याची संस्कृती

सह्याद्रीतील गडकिल्ले संपूर्ण कुटुंबासह सर करणे, ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाच्या माध्यमातून इतिहासाशी नाते जोडणे, ही दुर्गभ्रमंतीची संस्कृती श्रीगोंदा तालुक्यात शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे आणि त्यांच्या पत्नी संगीता इंगळे या दाम्पत्याने रुजवली. गेल्या १०४ महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या वाटचालीला आता व्यापक स्वरूप मिळाले असून अनेक कुटुंबे या चळवळीत सहभागी होत आहेत.

गडकिल्ल्यांच्या भटकंतीसोबतच वारसा संवर्धन, बारव जतन आणि शिवविचारांची संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवदुर्ग परिवाराकडून सुरू आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या वाटांवरून चालताना केवळ गड-किल्ले सर होत नाहीत, तर इतिहासाची जाण, धाडस, शिस्त आणि संस्कारांची नवी पिढी घडत आहे.

या मोहिमेत शिवदुर्गचे युवामावळे नीरज पाडळे, आविष्कार इंगळे, अर्णव वाघमोरे, श्रावणी कुलांगे, ऋतुजा खेतमाळीस, अक्षिका इंगळे आणि विराज सांगळे यांनीही सहभाग नोंदवला.

बालवयात ५२ किमींची पदभ्रमंती पूर्ण करणाऱ्या राजवीर आणि आदित्यच्या या पराक्रमातून ‘इतिहास केवळ पुस्तकात वाचायचा नसतो, तर तो अनुभवायचाही असतो’ हा संदेश नव्या पिढीला मिळत आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, सह्याद्रीच्या वाटेवरून युवा पिढी घडत असल्याचे प्रेरणादायी चित्र या मोहिमेतून समोर आले आहे.

– प्रा. भरत खोमणे

सदस्य, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन