उपजिल्हाधिकारी जितेंद्र इंगळे यांचा खांडगाव तरुणांच्या वतीने नागरी सत्कार, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते गौरव; ५१ कर्तबगार तरुणांचाही सन्मान
खांडगाव : दि. ३१ ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर
ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारणाऱ्या खांडगावचे सुपुत्र तथा पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या यशाचा गौरव गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने केला. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्या हस्ते जितेंद्र इंगळे यांचा तरुण व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खांडगावच्या ५१ कर्तबगार तरुणांचाही सन्मान करण्यात आला.
उच्च प्रशासकीय पदावर पोहोचल्यानंतरही आपल्या मातीतली नाळ कायम जपणाऱ्या जितेंद्र इंगळे यांच्या यशाचे यावेळी कौतुक करण्यात आले. दुर्गम भागातील सामान्य कुटुंबातून पुढे येत शिक्षण, जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर त्यांनी मिळवलेले यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण खांडगावसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. डॉ. सुप्रिया इंगळे यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करून भारतीय पेटंट मिळवल्याबद्दल, आकाश टकले यांची एमपीएससीच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल, तर सुनील टकले व संजय टकले यांची पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
“ग्रामीण व दुर्गम भागातील या गुणवंतांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे. गावातील तरुण व विद्यार्थ्यांनी या यशातून प्रेरणा घेत आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. शिक्षण, रोजगार आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आपण सातत्याने करू,” असा विश्वास आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केला.
गावच्या मातीतली माणसे गावानेच जपली पाहिजेत…
गावात जन्मलेली आणि विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी माणसे ही त्या गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी सामाजिक जबाबदारी आहे. ‘आपण आपल्या मातृभूमीचे काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून खांडगावातील तरुणांनी पुढाकार घेत प्रथमच असा नागरी सन्मान सोहळा आयोजित केला. या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
जितेंद्र इंगळे यांच्यासह ५१ गुणवंत तरुणांचा सन्मान हा खांडगावच्या कर्तृत्वाची सामूहिक पावती ठरला. एका व्यक्तीच्या यशाचा गौरव करताना गावातील इतर गुणवंतांनाही व्यासपीठ देण्याची भूमिका निश्चितच अनुकरणीय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे मार्गदर्शक व ज्येष्ठ आदर्श शिक्षक पोपट गोसावी गुरुजी होते. प्रस्ताविक राजेश इंगळे यांनी केले. निवेदन अशोक टकले यांनी केले, तर आभार सूर्यभान टकले यांनी मानले.यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, बाळासाहेब महाडिक, काकासाहेब ढवळे, लक्ष्मण महाराज टकले, आनंदराव भगत, शंकर टकले, राम घोडके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, तरुण-तरुणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय शिंदे, दिलीप शिंदे, संदीप शिंदे, युवराज ढवळे यांच्यासह अनेक तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यामुळे हा सोहळा केवळ सत्काराचा कार्यक्रम न राहता ‘गावच्या मातीतील कर्तृत्वाला गावाने दिलेली सलामी’ ठरला.
