सह्याद्रीच्या कुशीत शिवदुर्गची १०५ वी ऐतिहासिक मोहिम; भोरगिरी ते भीमाशंकर जंगलवाटेवर १५३ मावळ्यांची निसर्गयात्रा…

सलग आठव्या वर्षी प्लॅस्टिक स्वच्छता मोहिम; ८ तालुक्यांतील शिवदुर्ग मावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

श्रीगोंदा | दि. १९ ऑगस्ट २०२६

गणेश कविटकर

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये इतिहास, निसर्ग, साहस आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवत महाराष्ट्राच्या ट्रेकिंग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची १०५ वी मोहीम नुकतीच उत्साहात पार पडली. श्रावण महिन्याचे निसर्गसौंदर्य अनुभवत भोरगिरी ते भीमाशंकर या सुमारे आठ किलोमीटरच्या जंगलवाटेवर तब्बल १५३ मावळ्यांनी पायधूळ घेतली. विशेष म्हणजे, या मोहिमेत सलग आठव्या वर्षी प्लॅस्टिक स्वच्छता अभियान राबवून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवदुर्ग शिलेदार टीमच्या नियोजनातून ही मोहीम पार पडली. अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत, पुणे, दौंड, बारामती, शिरूर, खेड व राजगुरूनगर परिसरातील मावळ्यांनी यात सहभाग घेतला. बालमावळे, युवा, पुरुष तसेच महिला रणरागिणींची लक्षणीय उपस्थिती या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले.

 

ऊन, वारा, पाऊस, धुके… आणि सह्याद्रीची अविस्मरणीय अनुभूती

 

भोरगिरी ते भीमाशंकर ही जंगलवाट म्हणजे प्रत्येक भटक्याच्या मनात कायमची घर करून राहणारी निसर्गयात्रा. श्रावणातील हिरवाई, पावसाच्या सरी, दाट धुके, जंगलातील ओलावा आणि डोंगरकपारीतून वाट काढत पुढे जाण्याचा थरार अशा वातावरणात शिवदुर्गच्या मावळ्यांनी सह्याद्रीचा मनमुराद आनंद लुटला.

या मोहिमेत महिलांचा आणि युवा पिढीचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. ग्रामीण भागातील महिलांना सहकुटुंब गडकिल्ले व निसर्गभ्रमंतीची संधी उपलब्ध करून देत ‘शिवदुर्ग हे केवळ ट्रेकिंगचे व्यासपीठ नाही, तर एक कुटुंब आहे’ ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

 

गडपूजनाने मोहिमेला सुरुवात…

 

शिवदुर्गच्या मोहिमेच्या परंपरेनुसार भोरगिरी येथे अभिनेते रामभाऊ जगताप यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. त्यानंतर जंगलवाटेने भीमाशंकरच्या दिशेने मोहिमेला सुरुवात झाली.

गुप्त भीमाशंकर परिसरातील साक्षी विनायक गणपती मंदिराजवळ नागपंचमीच्या निमित्ताने महिला रणरागिणींच्या वतीने वारुळाचे पूजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून पाहायला मिळाला.

याच परिसरात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरू खारीचे दर्शन अनेकांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी अनुभूती ठरली. धबधबे आणि गुप्त भीमाशंकर परिसरातील पाण्यात अनेकांनी मनसोक्त भिजण्याचा आणि निसर्गाचा आनंद घेण्याचा अनुभव घेतला.

 

‘दोन हातांना जेवढे शक्य आहे, तेवढा प्लॅस्टिक कचरा उचलू…’

 

या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सलग आठव्या वर्षी राबविण्यात आलेली ८१ वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम. भोरगिरी ते भीमाशंकर जंगलवाटेवर आढळणारा प्लॅस्टिक कचरा शिवदुर्गच्या मावळ्यांनी आणि रणरागिणींनी एकत्रितपणे गोळा केला. सुमारे पाच गोण्या प्लॅस्टिक कचरा संकलित करून तो योग्य ठिकाणी सुपूर्द करण्यात आला.

‘संपूर्ण जंगलातील प्लॅस्टिक आपण साफ करू शकत नसलो, तरी आपल्या दोन हातांना जेवढे शक्य आहे तेवढे प्लॅस्टिक उचलायचे’ हा शिवदुर्गचा विचार या उपक्रमातून कृतीत उतरला. विशेष म्हणजे, या मोहिमेत सहभागी झालेल्या बालमावळ्यांच्या मनावर लहान वयातच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचे काम झाले.

 

महिलांच्या विश्वासाचे हक्काचे व्यासपीठ….

ग्रामीण भागातील महिलांसाठी शिवदुर्गने निर्माण केलेले व्यासपीठ या मोहिमेत पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कुटुंबाच्या संमतीने आणि सहकार्याने महिला रणरागिणी मोठ्या आत्मविश्वासाने सह्याद्रीच्या वाटा तुडवत आहेत. ‘शिवदुर्ग परिवार म्हणजे लहान-थोर, महिला आणि युवा अशा सर्वांना आपलासा वाटणारा परिवार’ अशा भावना सहभागी महिलांनी व्यक्त केल्या.शिवदुर्गच्या मोहिमांमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना गडकिल्ले, सह्याद्री आणि निसर्ग जवळून अनुभवण्याची संधी मिळत असून, साहसाबरोबरच पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची शिकवण या मोहिमांमधून दिली जात आहे.

 

१५३ मावळ्यांच्या पावलांनी सह्याद्री पुन्हा अनुभवला..

या मोहिमेत विविध क्षेत्रांतील आणि वेगवेगळ्या वयोगटांतील १५३ सदस्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येकाच्या पावलात साहस, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रत्येकाच्या मनात सह्याद्रीबद्दलची आस्था दिसून आली.ही केवळ आठ किलोमीटरची जंगलभ्रमंती नव्हती; तर इतिहासाशी नाते जोडणारी, निसर्गाशी संवाद साधणारी, पर्यावरणाची जबाबदारी शिकवणारी आणि कुटुंबांना एकत्र आणणारी प्रेरणादायी चळवळ होती.

 

मोहिमेच्या यशासाठी योगदान…..

मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी मोहिम प्रमुख सोमेश शिंदे यांच्यासह संगिता इंगळे, अक्षय ओहळ, अमोल बडे, प्रा. प्रमोद परदेशी, चेतन चौधरी, सुनील मोरे, डॉ. संजय वाघमोरे, गणेश कविटकर, प्रा. अमर भोसले, अभिनेते रामभाऊ जगताप, तारा चांदगुडे, महेश क्षीरसागर आणि नीरज पाडळे यांनी विशेष योगदान दिले. सह्याद्रीची वाट कितीही कठीण असो, पावलांना दिशा आणि मनाला ध्येय असेल तर प्रत्येक वाट इतिहास घडवते. शिवदुर्गच्या १०५ व्या मोहिमेने साहसासोबतच निसर्गसंवर्धनाचा हा संदेश पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.