आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वगुणांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक; श्रीगोंदकरांना केले भावनिक आवाहन
श्रीगोंदा |दि. २० ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर
“आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अभ्यासू, तरुण आणि गुणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची क्षमता आहे. त्यामुळे श्रीगोंदकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी विक्रमला सुट्टी द्यावी,” असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
आमदार विक्रम पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत रवींद्र चव्हाण बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, विक्रम पाचपुते यांचे वय अजून कमी आहे. ते तरुण आहेत, प्रचंड प्रवास करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एखादा प्रश्न समोर आला की, तो केवळ मांडून थांबण्याची त्यांची भूमिका नसते, तर त्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन ते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात.
“विक्रम हा केवळ आमदार म्हणून नव्हे, तर एक अभ्यासू आणि प्रभावी कार्यकर्ता म्हणून पुढे येत आहे. त्याच्या वक्तृत्वात मुद्दा आहे, अभ्यासात खोली आहे आणि प्रश्नांच्या पाठपुराव्यात सातत्य आहे. अशा तरुण नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे,” अशा शब्दांत चव्हाण यांनी पाचपुते यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
श्रीगोंद्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विक्रम पाचपुते यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना चव्हाण यांनी श्रीगोंदकरांना थेट साद घातली. “श्रीगोंदकरांनो, विक्रमला महाराष्ट्रासाठी द्या. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी त्यांना तुम्ही सुट्टी द्या,” या रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनाने बैठकीतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश निर्माण झाला.
चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाची चर्चा आता केवळ श्रीगोंदा मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातील संभाव्य नेतृत्व म्हणून होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरुण नेतृत्व, अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व आणि प्रश्नांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर पाचपुते यांची पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
