ओंकार साखर कारखान्याच्या नव्या मुख्य कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

पुणे | दि. २७ ऑगस्ट २०२६

 

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नव्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी पुणे येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार जयंतभाई पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. ओंकार ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रेपाटील, ओमराजे बोत्रेपाटील, रेखाताई बोत्रेपाटील आणि गौरीताई बोत्रेपाटील यांच्यासह ग्रुपमधील विविध कारखान्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून उद्योगाची भरारी

यावेळी मान्यवरांनी ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या कार्याचा गौरव केला. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या बोत्रेपाटील यांनी अल्पावधीत साखर उद्योगासह विविध औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय विस्तार साधला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शेतकरी हिताला प्राधान्य, रोजगारनिर्मिती आणि उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मान्यवरांनी कौतुक केले.

ओंकार ग्रुपने साखर उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी जोडलेले मजबूत नाते निर्माण केले असून, नव्या मुख्य कार्यालयामुळे समूहाच्या प्रशासकीय आणि औद्योगिक विस्ताराला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास ओंकार ग्रुपमधील विविध कारखान्यांचे जनरल मॅनेजर, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवे मुख्य कार्यालय हे ओंकार ग्रुपच्या वाढत्या औद्योगिक वाटचालीचे नवे केंद्र ठरणार असून, भविष्यातील विस्तारासाठी त्यातून अधिक सक्षम नियोजनाला चालना मिळणार आहे.