तलावातील पाणी वापरावरील बंदी उठवून शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; कोळगाव फाट्यावर शेतकऱ्यांची निर्णायक बैठक
श्रीगोंदा | दि. २७ सप्टेंबर २०२६
गणेश कविटकर
तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना तलावांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यास घातलेली बंदी आणि बंद करण्यात आलेला शेतीपंपांचा वीजपुरवठा यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिला.
कोळगाव फाटा येथील कांडेकर लॉन्स येथे रविवारी शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. विसापूर, मोहरवाडी, घोटवी, पारगाव, औटेवाडी, घोडेगाव, देऊळगाव यासह विविध भागांतील तलावांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही त्याचा शेतीसाठी वापर करण्यास प्रतिबंध केला जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यातच शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद झाल्याने उभी पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आमदार विक्रम पाचपुते यांनी दूरध्वनीद्वारे शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंगळवारी महसूल मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठक होणार असल्याने सध्या आंदोलनाची भूमिका न घेता बुधवारपर्यंत प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी, त्यानंतर सर्वजण मिळून पुढील भूमिका ठरवू, असे आवाहन पाचपुते यांनी केले.
बैठकीचे प्रास्ताविक करताना माजी जि.प. सदस्य हेमंत नलगे यांनी तलावातील पाणी आणि वीजपुरवठा हा शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न असल्याचे सांगितले. “पाणी आणि वीज उपलब्ध करून दिली नाही, तर हातातोंडाशी आलेली पिके हातातून जाण्याची भीती आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
जि.प. सदस्य दिनूकाका पंधरकर यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध करत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्रित संघर्ष करण्याची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनीही घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अंतर दूर करण्याची मागणी केली. प्रशांत दरेकर यांनी पाणी व वीज प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
‘बुधवारपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरू’
शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “सोमवार, २८ सप्टेंबर रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तलावातील पाणी वापरावरील बंदी उठविण्याची तसेच शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करणार आहोत. आमदार विक्रम पाचपुते यांच्या विनंतीचा मान ठेवून बुधवारपर्यंत निर्णयाची प्रतीक्षा करू. मात्र, सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्वपक्षीय लढा उभारून शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यात येईल.”
शेतकऱ्यांच्या पाणी, वीज आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बैठकीस जि.प. सदस्य दिनूकाका पंधरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, माजी जि.प. सदस्य हेमंत नलगे, नितीन नलगे, भूषण बडवे, बाळासाहेब नलगे, विष्णुपंत जठार, नितीन डुबल, माऊली मोटे, अमित लगड, विश्वास थोरात, प्रतिभाताई धस यांच्यासह कोळगाव, विसापूर व घारगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
