अहिल्यानगर जिल्हा कारागृहात राष्ट्रभक्तीचा जागर; महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात

अहिल्यानगर | दि. ०४ सप्टेंबर २०२६

गणेश कविटकर

 

कारागृहातील बंदीवानांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासोबतच मानसिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्त्व परिवर्तनाला चालना देण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा कारागृहात २ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला अनुसरून बंदीवानांसाठी वर्षभर विविध सण, उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून ध्वज दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक व गिटारवादक गिरीराज जाधव, प्रसिद्ध गायक व पियानोवादक नरेंद्र साळवे तसेच उत्तम तबलावादक सार्थक डावरे यांनी सांस्कृतिक सादरीकरण करत कार्यक्रमात रंग भरला. त्यांच्या सुमधुर देशभक्तीपर व भक्तिगीतांनी कारागृह परिसर अक्षरशः देशभक्तीमय वातावरणाने भारून गेला.

अहिल्यानगर जिल्हा कारागृहातील कर्तव्य बजावणाऱ्या वरिष्ठ लिपिक श्रीमती सुनीता धर्माधिकारी यांनीही कार्यक्रमात विशेष सहभाग नोंदवत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. बंदीवानांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

यावेळी कारागृह अधीक्षक संतोष कवाड यांनी बंदीवानांच्या सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. “कारागृहातील बंदीवानांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची अत्यंत गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

सदर उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. सुहास बारके यांच्या संकल्पनेतून तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग श्रीमती अरुणा मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी तुरुंगाधिकारी श्रेणी १ विजय साळुंके, वैद्यकीय अधिकारी श्रीमती सुजाता सानप, सुभेदार संजय शिंदे, हवालदार सुनील विधाते, गणेश बेरड, सुर्यकांत ठोंबरे, संदीप जन्हाड, राहुल पठारे, नंदकुमार शिंदे, श्रीकांत गोरवाडे, किरण ढमाळे, चंद्रशेखर आठरे, करण बेंदे, श्रीमती माधुरी धनाड, श्रीमती संमिता पवार यांच्यासह कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.