श्रीगोंद्यात ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ स्पर्धेचा जागर; पर्यावरणपूरक उत्सवाला रोख बक्षिसांचे बळ

प्रथम क्रमांकासाठी २,५०१ रुपये; घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना सहभागाची संधी

श्रीगोंदा | दि. ०७सप्टेंबर २०२६

गणेश कविटकर

 

पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत ‘इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, उत्कृष्ट उपक्रमांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. स्पर्धेसाठी श्रीगणेशाची मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. सजावटीसाठी नैसर्गिक साहित्याचा वापर करणे अपेक्षित असून थर्माकोल, पीओपी आणि प्लास्टिकसारख्या पर्यावरणास घातक साहित्याला स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. टाकाऊ वस्तूंचा कल्पक पुनर्वापर, स्वच्छतेचा संदेश तसेच विधायक सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीला परीक्षणात विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी नगरपरिषदेने आकर्षक रोख पारितोषिके जाहीर केली आहेत. प्रथम क्रमांक : २,५०१ रुपये, द्वितीय क्रमांक : २,२०१ रुपये, तृतीय क्रमांक : १,१११ रुपये, चतुर्थ क्रमांक : १,००१ रुपये, पाचवा क्रमांक : १,००१ रुपये याशिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सहभाग प्रशस्तिपत्रक देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीनंतर स्पर्धकांनी गणेशमूर्ती व सजावटीचे तीन वेगवेगळे स्पष्ट फोटो संबंधित ऑनलाइन लिंक तसेच फेसबुक पेजवर अपलोड करून ‘Shrigonda Municipal Council’ला टॅग करणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल २५ ऑक्टोबर २०२६ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता तो स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरावा, यासाठी जास्तीत जास्त नागरिक व गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा श्रीमती सुनिताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष सौ. अलकाताई अनभुले, मुख्याधिकारी श्रीमती पुष्पांजली भगत यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.