ट्रेकिंगमधून सुदृढ युवा पिढी घडतेय; गड-किल्ले वारसा जपण्यासाठी तरुणांनी पुढे यावे

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची ८ वी वार्षिक सभा काशीबारव येथे उत्साहात; सहा तरुणांचा ‘आदर्श शिवदुर्ग मावळा व रणरागिणी’ पुरस्काराने गौरव

 

श्रीगोंदा | दि. २० सप्टेंबर २०२६

गणेश कविटकर

 

गडकिल्ले ट्रेकिंग, वारसा संवर्धन आणि तरुणांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेलवंडी कोठार येथील काशीबारव परिसरातील साई मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला नगर-पुणे जिल्ह्यातील शिवदुर्ग परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ट्रेकिंगच्या माध्यमातून तरुण पिढीला मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवत शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ बनविता येते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंती करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास आणि वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम तरुणांनी करावे,” असे आवाहन अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले.

सभेच्या प्रारंभी अजित दळवी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सचिव सोमेश शिंदे यांनी मांडला. उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर आणि संकेत नलगे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती वागसकर व प्रा. भरत खोमणे यांनी केले, तर नवनाथ गोरे यांनी आभार मानले.

 

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध ठराव

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची पायधूळ घेणे, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ट्रेकिंगच्या माध्यमातून आरोग्य जपणे, मोबाईलच्या अतिवापरापासून तरुणांना दूर ठेवणे तसेच गड-किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि स्थानिक वारसा यांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले.

“सह्याद्री केवळ डोंगररांगा नाहीत, तर तो आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. हा वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीने स्वीकारली पाहिजे,” असा संदेश सभेतून देण्यात आला.

 

सहा तरुणांचा राज्यस्तरीय सन्मान

 

शिवदुर्ग परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यातून आणि शिवविचारांतून समाजासाठी योगदान देत आहे. विशेषतः लहान वयात वारसा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांच्या कामाचे कौतुक यावेळी करण्यात आले. तनिष्का मोरे, त्रिवेणी कडूस, प्रतिभा इथापे, दिगंबर भुजबळ, सचिन भोसले आणि चेतन चौधरी यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘आदर्श शिवदुर्ग मावळा व रणरागिणी’ राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले.

 

सह्याद्री भटकंतीसोबत स्थानिक वारशाचीही जपणूक

 

सह्याद्रीच्या कडेकपारी, गड-किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतानाच स्थानिक पातळीवरील वारसा जपणारी आणि संवर्धनासाठी प्रत्यक्ष काम करणारी तरुणाई घडविण्याचा संकल्प शिवदुर्ग परिवाराने व्यक्त केला.

या उपक्रमात साईकुमार शिंदे, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, रमेश चांदगुडे, तारा चांदगुडे, सुनील मोरे, अर्चना मोरे, मिठू लंके, सुचित्रा दळवी, त्रिवेणी कडूस, विजया लंके, दिनेश अडसूळ, राकेश अग्रवाल, तुषार चौधरी, प्रणव गलांडे, चेतन चौधरी, आविष्कार इंगळे, अक्षिका इंगळे आणि स्वाती मुळे यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे नियोजन ईश्वर कोठारे, अक्षय ओहळ, सागर शिंदे, नीरज पाडळे, सोनू शिंदे आणि गौतम निकम यांनी केले.

गड-किल्ल्यांवरील भटकंतीला केवळ पर्यटन न मानता इतिहास, आरोग्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी चळवळ म्हणून पुढे नेण्याचा निर्धार या वार्षिक सभेतून व्यक्त करण्यात आला.