मतदार यादीत नाव आहे का ? आजच तपासा; दावे-हरकतींसाठी महिनाभराची संधी

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ४० हजारांहून अधिक नोंदींच्या पडताळणीची गरज

 

श्रीगोंदा | दि. ३१ ऑगस्ट २०२६

गणेश कविटकर

 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीतील नाव हीच पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने प्रत्येक नागरिकाने आपले नाव, पत्ता, वय, लिंग तसेच कुटुंबातील पात्र सदस्यांची नावे यादीत आहेत की नाहीत, याची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४८ हजार २२६ मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीत ३ लाख ८ हजार ११६ मतदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. दरम्यान, मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांच्या ४० हजार ११० नोंदी, मतदार यादीतील १९ हजार ५८३ विसंगत नोंदी, तर १२ हजार ६७९ मॅप न केलेले मतदार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप यादीचे बारकाईने परीक्षण करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची जबाबदारी आता नागरिकांवरही आली आहे.

 

चूक दिसली तर गप्प राहू नका

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यातील त्रुटी निदर्शनास आणून देण्यासाठी आणि पात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यासाठी दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे-हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी केवळ स्वतःचे नाव तपासण्यापुरते मर्यादित न राहता कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची नावेही तपासावीत.

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नसल्यास Form 6 द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास Form 8 द्वारे अर्ज करता येणार आहे. मतदार यादीतील चुकीच्या अथवा आक्षेपार्ह नोंदींबाबतही विहित प्रक्रियेनुसार हरकत नोंदविता येणार आहे.

 

४ नोव्हेंबरला अंतिम यादी

दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत असून, त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटिसा तसेच दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर, भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर तसेच संबंधित मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांच्याकडे पाहता येणार आहे.

 

मतदार यादी अचूक असणे ही लोकशाहीची गरज

मतदार यादीतील प्रत्येक नावामागे एका नागरिकाचा मतदानाचा अधिकार दडलेला आहे. पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणे जितके गंभीर, तितकेच मयत, स्थलांतरित किंवा दुबार मतदारांच्या नोंदी कायम राहणेही निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या जागरूकतेची जोड मिळणे आवश्यक आहे.

‘आपले नाव, आपला हक्क, आपली जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक नागरिकाने प्रारूप मतदार यादी तपासावी. नाव राहून गेले असल्यास, चुकीची नोंद असल्यास किंवा अन्य कोणतीही विसंगती आढळल्यास ३० सप्टेंबरपूर्वी दावा अथवा हरकत दाखल करावी. मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक असणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, सक्षम आणि पारदर्शक लोकशाहीसाठी प्रत्येक जागरूक नागरिकाचीही जबाबदारी आहे.