अहिल्यानगर, दि. २७ : राष्ट्रभक्तीचा हुंकार, भक्तीचा महासागर आणि एकजुटीचा अभूतपूर्व संगम असा ऐतिहासिक क्षण श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे अनुभवायला मिळाला. संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २५ ऑगस्ट रोजी तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनातून साकारलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाने श्रीक्षेत्र धनगरवाडीचे नाव जागतिक विक्रमाच्या पटलावर कोरले गेले.
‘वंदे मातरम्’च्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लाखो भाविकांनी एकाच सुरात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करत राष्ट्रभक्तीची भावना जागवली. भक्ती, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम यांचा अनोखा संगम या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
यापूर्वीचा विक्रम मोडीत
‘वंदे मातरम्’चे एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी सामूहिक गायन करण्याचा यापूर्वीचा विश्वविक्रम १ लाख ४ हजार ६३७ सहभागींच्या नावावर होता. १२ जानेवारी २०१० रोजी पुणे येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या ‘अंतर्नाद’ या संगीत कार्यक्रमात हा विक्रम नोंदविण्यात आला होता. धनगरवाडीतील ५ लाख २५ हजार ५११ भाविकांच्या सहभागाने हा विक्रम तब्बल चारपटीहून अधिक संख्येने मागे टाकण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
या ऐतिहासिक विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र श्रीक्षेत्र सरला बेटचे मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांना विनर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स वर्ल्डचे अध्यक्ष तथा १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मिस इंडिया तथा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या चेअरमन डॉ. ईशा अग्रवाल यांनीही महंत श्री रामगिरी महाराज यांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
या सोहळ्यास श्रीक्षेत्र सरला बेटचे विश्वस्त व मार्गदर्शक मधु महाराज, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, आमदार विवेक कोल्हे, कोपरगावचे आमदार आशुतोष अशोकराव काळे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, संगमनेरचे आमदार अमोल खताळे, नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भक्तीबरोबर राष्ट्रभक्तीचा संदेश
अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून लाखो भाविकांना अध्यात्माची अनुभूती देतानाच या विश्वविक्रमी उपक्रमातून ‘भक्ती आणि राष्ट्रभक्ती हातात हात घालून पुढे जाऊ शकते’ असा व्यापक संदेश देण्यात आला. पाच लाखांहून अधिक भाविकांनी एकाच वेळी केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने श्रीक्षेत्र धनगरवाडीचा परिसर अक्षरशः राष्ट्रभक्तीच्या जयघोषाने भारावून गेला.
