श्रीगोंदा | दि. २७ ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर
नागरिकांची गैरसोय दूर करून दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि एकाच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत असलेले मुद्रांक विक्रेते आता दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) कार्यालयाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहणार नसून त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.
तहसीलदार सचिन डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि दुय्यम निबंधक गोरख तारगे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मुद्रांक विक्रेत्यांची जागा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २७ ऑगस्ट २०२६ पासून दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात ही नवीन व्यवस्था कार्यान्वित झाली आहे.
दस्त नोंदणीची प्रक्रिया करताना स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासत असल्याने नागरिक, वकील तसेच दस्त नोंदणीशी संबंधित व्यक्तींना पूर्वी पोलीस ठाणे परिसरात जावे लागत होते. आता मुद्रांक विक्री केंद्र थेट सब रजिस्टर कार्यालयाच्या आवारात उपलब्ध झाल्याने दस्त नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच अनावश्यक धावपळही कमी होणार आहे.
दरम्यान अनेक वर्षे पोलीस ठाणे आवारात सेवा देणारे मुद्रांक विक्रेते मिलिंद कुलकर्णी, अर्जुन मडके आणि भारत सूर्यवंशी यांचा श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान करून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. दीर्घकाळ पोलीस ठाणे परिसरातून नागरिकांना सेवा देणाऱ्या या मुद्रांक विक्रेत्यांच्या योगदानाबद्दल पोलीस प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली.
नागरिकांनी नोंद घ्यावी
नवीन व्यवस्थेनुसार स्टॅम्प पेपर खरेदीसाठी नागरिकांनी आता दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) कार्यालय परिसरातील अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वकील, दस्तलेखक आणि दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सर्व संबंधितांनीही या बदलाची नोंद घ्यावी.
नागरिकांची सोय आणि शासकीय कामकाजातील सुसूत्रता यांचा विचार करून घेतलेला हा निर्णय दस्त नोंदणी प्रक्रियेला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
