लोडशेडिंगच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण; ३१ ऑगस्टला आमरण उपोषण

श्रीगोंदा | दि ३० ऑगस्ट २०२६

गणेश कविटकर

 

वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराविरोधात आणि शेतकरी व नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, या मागणीसाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. वारंवार खंडित होणारी वीज, अनियमित लोडशेडिंग आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीचे संपूर्ण नियोजन सिंचनाच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून असताना वीज कधी येईल आणि कधी जाईल, याचा भरवसा राहिलेला नाही. वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेमुळे पिकांचे नियोजन, उत्पादन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंतचे लोडशेडिंग तातडीने बंद करावे, ही आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, नागरिकांनाही दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसाही नियमित वीज मिळत नसल्याने शेतीसाठी सिंचन करणे कठीण झाले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सायंकाळी सहा ते नऊचे लोडशेडिंग बंद करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नियमित वीज देणे, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, वारंवार होणारे खंडित लोडशेडिंग थांबविणे तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, यांचा समावेश आहे.

वीज ही शेतकऱ्यांसाठी केवळ सुविधा नसून शेतीच्या उत्पादनाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. “गलथान कारभाराविरुद्ध एकजुटीने लढा देऊन हक्काची वीज मिळवू,” असा निर्धार राजेंद्र म्हस्के यांनी व्यक्त केला असून, ३१ ऑगस्टच्या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.