श्रीगोंदा : दि. 26 जून 2026
गणेश कविटकर
समाजातील एकल महिलांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणारा आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन श्रीगोंदा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमातून एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शैक्षणिक संकुलच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाचपुते होत्या. यावेळी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुळे, महिला व बालकल्याण सभापती मिरा शिंदे, नगरसेवक, नगरसेविका तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमात एकल महिलांच्या समस्या, त्यांच्यासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हाने तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांनी संघटित होऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे, यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून तसेच शासनाच्या विविध योजनांद्वारे महिलांना उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे आणि मार्गदर्शन याबाबतही उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात एकल महिलांच्या आत्मसन्मानाचा गौरव करत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत बचत गट, स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित सर्व एकल महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
