पुण्यातील घरफोडी प्रकरणातील आरोपी श्रीगोंद्यात जेरबंद; विश्रांतवाडी व श्रीगोंदा पोलिसांची संयुक्त कारवाई

श्रीगोंदा : दि. 30 जून 2026

गणेश कविटकर

पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांतील फरार आरोपीला श्रीगोंदा येथे अटक करण्यात विश्रांतवाडी व श्रीगोंदा पोलिसांना यश आले. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ व गुन्हा क्रमांक १५५/२०२५ हे घरफोडीचे गुन्हे बीएनएस कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत दाखल आहेत. या गुन्ह्यांतील आरोपी अमीर शिंदे (रा. घायपतवाडी, आढळगाव रोड, ता. श्रीगोंदा) हा श्रीगोंदा परिसरात असल्याची गोपनीय माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पथक श्रीगोंदा येथे दाखल झाले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या मदतीने पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचला आणि आरोपी अमीर शिंदे याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल गाडे, संजय बादरे तसेच पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव, किशोर भुसारे आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गहिनीनाथ यादव, पोलीस कर्मचारी संदीप राऊत, विवेक दळवी व मयूर तोरडमल यांनी सहभाग घेतला.