श्रीगोंद्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू

वर्षभराच्या पाठपुराव्याला यश; अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाईला मिळणार अधिक बळ. टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांच्या प्रयत्नाला यश

श्रीगोंदा : दि. 30 जून 2026

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा तालुक्यात वाढत्या अवैध दारूविक्री, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर मद्यव्यवसायावर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय श्रीगोंदा शहरात सुरू करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाल्याने अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या कार्यालयासाठी स्वराज्य जनजागृती परिषदेचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांनी गेल्या वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाकडे निवेदने सादर करणे, विविध स्तरांवर पाठपुरावा करणे, आंदोलनाचा इशारा देणे तसेच अहिल्यानगर येथे आंदोलन छेडण्याबरोबरच १६ जून रोजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत शासनाने श्रीगोंद्यात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अहिल्यानगर येथे असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. आता मात्र श्रीगोंद्यातच कार्यालय कार्यरत झाल्याने अवैध दारू विक्री, गावठी दारू, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर अधिक वेगाने व प्रभावीपणे कारवाई करणे शक्य होणार आहे.

गेल्या काही महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध भागांत धडक कारवाया करून अनेक गुन्हे दाखल केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे अवैध मद्यव्यवसाय करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि पारनेर या चार तालुक्यांतील कारभार आता स्थानिक स्तरावर अधिक प्रभावीपणे नियंत्रित केला जाणार असून नागरिकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी कठोर मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

सरकारी इमारतीसाठी पाठपुरावा कायम

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा महाराष्ट्र शासनाला दरवर्षी सुमारे २९ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. राज्यात २४ नवीन कार्यालये तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली असली, तरी अनेक ठिकाणी कार्यालये प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती. वर्षभर सातत्याने पाठपुरावा, आंदोलने आणि उपोषणाच्या इशाऱ्यानंतर श्रीगोंदा येथे कार्यालय सुरू झाले आहे. मात्र हे कार्यालय सध्या भाड्याच्या जागेत कार्यरत असून, त्यासाठी स्वतंत्र शासकीय इमारत उभारण्यात यावी, यासाठी पुढेही पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे टिळक भोस यांनी सांगितले. तसेच श्रीगोंदा तालुक्यासह परिसरातील अवैध दारूविक्री, गावठी दारू आणि हातभट्टीचे धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी संघर्ष कायम राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.