मढेवडगावच्या इतिहासाला नवी उजळणी…..

सरदार वाबळे गढीच्या शिलालेखातून उलगडला पानिपतवीर जानराव वाबळे यांचा ऐतिहासिक वारसा……

 

श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६

गणेश कविटकर

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव हे गाव ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. या गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या सरदार वाबळे गढीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुमारे २७० वर्षांपूर्वीचा शिलालेख आता इतिहासाच्या नव्या दालनाचे दरवाजे उघडत आहे. या शिलालेखात पानिपत युद्धातील वीर सरदार जानराव वाबळे यांच्यासह वाबळे घराण्याच्या कार्याचा उल्लेख आढळून येत असल्याने या शोधाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील हा आठ ओळींचा शिलालेख शालिवाहन शक १६७७ (इ.स. १७५५) मधील आहे. अनेक वर्षे उघड्यावर पडून राहिल्यामुळे त्यावरील अनेक अक्षरे झिजली, तुटली आणि काही भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. मात्र अथक परिश्रम, शिलालेखाचा छाप आणि सूक्ष्म अभ्यासाच्या आधारे त्यातील महत्त्वाचा मजकूर वाचण्यात यश आले.

 

शिलालेखाचे वाचन –

१. श्री बहीरवनाथ प्रसन्न जयाचे.चरणी दृढ भाव येमाजी वलद येसवंत

२.राव पाटील वाबळे मोकदम तयाचे पुत्र संताजी पाटील व राणोजी पाटील व चापाजी पाटील

३.व जानराव पाटील व यशवंतराव पा. वाबळे मौजे मढेवडगाव प्रा. कर्डे शालिवाहन शके १६७७

४.युवा नाम संवत्सरे आषाढ सुद १ …. गढीचा दरवाजा

५.देवीच्या मंदिराचा पाया या सर्वांनी घातला……

६.अष्टकोनी बुरुज वाडा झाला……

७.तटबंदी करून झाली ……..

८.वेळेस करोन दिला…….

 

शिलालेखात येमाजी वलद येसवंतराव पाटील वाबळे मोकदम यांचे पुत्र संताजी, राणोजी, चापाजी, जानराव आणि यशवंतराव पाटील वाबळे यांचा स्पष्ट उल्लेख आहे. या सर्वांनी मिळून गढीचा भव्य प्रवेशद्वार उभारला, देवीच्या मंदिराचा पाया घातला, अष्टकोनी बुरुजासह वाडा उभारला आणि गावाभोवती तटबंदी पूर्ण केली, अशी ऐतिहासिक नोंद या शिलालेखात आढळते.

या नोंदीतून अठराव्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्रातील गावव्यवस्था, मोकदम-पाटील व्यवस्था, संरक्षणात्मक बांधकामे आणि धार्मिक श्रद्धा यांचे प्रभावी दर्शन घडते. त्या काळात गढी, तटबंदी, वाडे आणि देवस्थान ही केवळ वास्तू नव्हती, तर गावाच्या सुरक्षिततेची, सामाजिक एकतेची आणि सांस्कृतिक अस्मितेची प्रतीके होती, हे या शिलालेखातून अधोरेखित होते.

विशेष म्हणजे, पानिपतच्या रणभूमीवर पराक्रम गाजविणाऱ्या सरदार जानराव वाबळे यांचे नाव या शिलालेखात आढळल्याने मढेवडगावच्या इतिहासाला नवे ऐतिहासिक अधिष्ठान लाभले आहे. त्यामुळे हा शिलालेख केवळ एका बांधकामाची नोंद नसून मराठा इतिहासातील स्थानिक नेतृत्व, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा जिवंत पुरावा ठरतो.

इतिहास हा केवळ पुस्तकांमध्ये नसतो; तो अशा दगडांवर कोरलेल्या अक्षरांतून पिढ्यानपिढ्या बोलत राहतो. मढेवडगावचा हा शिलालेखही त्याच परंपरेतील एक अमूल्य दस्तऐवज आहे. या वारशाचे जतन, संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास होणे ही काळाची गरज असून, अशा ऐतिहासिक ठेव्यांमुळे ग्रामीण महाराष्ट्राचा विस्मृतीत गेलेला इतिहास नव्या पिढीसमोर अभिमानाने उभा राहत आहे.

शिलालेखाचे संशोधन राजेश इंगळे यांनी केले असून, शिलालेखाचे वाचन पुणे येथील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी केले आहे. तसेच शिलालेखाचा शोध, छाप, छायाचित्रण आणि संवर्धनासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती, वाबळे परिवार आणि सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

इतिहास जपणारी ही अक्षरे केवळ दगडावर कोरलेली नाहीत; ती मढेवडगावच्या वैभवाची, मराठ्यांच्या पराक्रमाची आणि आपल्या सांस्कृतिक अस्मितेची अजरामर साक्ष आहेत.