श्रीगोंदा | दि. 26 जून 2026
गणेश कविटकर
ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अनालॉग चीज (Cheese Analogue) या विषयावर गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पुण्यात झालेली कारवाई ही ग्राहकहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असल्याची भावना आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.
पनीरच्या नावाखाली अनालॉग चीजचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने घेतलेली कठोर भूमिका ही जनहिताला प्राधान्य देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई मानली जात असून ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ती एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मार्च २०२५ पासून हा विषय सातत्याने शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, अन्नपदार्थांच्या विक्रीत पारदर्शकता असावी आणि ग्राहकांना ते काय खात आहेत याची स्पष्ट माहिती मिळावी, या उद्देशाने हा पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेत प्रभावी कारवाई केल्याने ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणार आहे.
या कारवाईबद्दल अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या संपूर्ण यंत्रणेचे आमदार विक्रम पाचपुते यांनी आभार मानले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अन्नसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ कायद्याचा विषय नसून सामाजिक जबाबदारीचा मुद्दा आहे. त्यामुळे अन्नपदार्थांबाबत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखणे ही प्रत्येक उत्पादक आणि विक्रेत्याची नैतिक जबाबदारी असल्याचे मतही पाचपुते यांनी व्यक्त केले.
