गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग; गौरी शुगरमध्ये मिल रोलर पूजन उत्साहात

हिरडगाव | दि. 23 जून 2026

गणेश कविटकर

 

गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि., हिरडगाव (युनिट क्र. ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या मिल रोलर पूजन समारंभाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात कारखान्याच्या आगामी हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रुपचे संचालक ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गळीत हंगामाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ओमराजे बोत्रेपाटील यांनी शेतकरी, कामगार आणि उद्योग यांच्यातील सुसंवाद व समन्वयाच्या बळावर ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कारखान्यात सुरू असलेल्या यांत्रिक दुरुस्ती, देखभाल व इतर आवश्यक कामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, आगामी हंगामात अधिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज होत आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून त्यांना उत्तम सेवा देण्यास व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आगामी गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देत कारखान्याच्या प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

मिल रोलर पूजनामुळे गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला औपचारिक प्रारंभ झाला असून, शेतकरी हित, कार्यक्षम ऊस गाळप आणि उद्योगाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. सज्ज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.