विसापूर | दि. 23 जून 2026
गणेश कविटकर
शिक्षण हीच खरी संपत्ती मानणाऱ्या आणि आपल्या शाळेचे ऋण फेडण्याची जाणीव जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी विसापूर येथील सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये एक हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. गरिबीमुळे शिक्षणाच्या वाटेवर अडथळे येऊ नयेत, कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना आर्थिक परिस्थितीची मर्यादा पडू नये, या उदात्त भावनेतून शंभराहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना तब्बल दोन लाख रुपयांचे शालेय साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसते, तर ती आयुष्य घडविणारी संस्कारशाळा असते. याच संस्कारांचे ऋण मनात जपलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेशी नाळ कायम ठेवत हा ‘लक्षवेधी’ उपक्रम राबविला. शाळा सुरू होताच अनेक गरीब विद्यार्थ्यांसमोर वह्या, गणवेश, दप्तर आणि इतर साहित्याची चिंता उभी राहते. ही चिंता दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्याचा प्रयत्न माजी विद्यार्थ्यांनी केला.
माजी प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, कंपास पेट्या, शालेय बॅगा आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. या मायेच्या भेटीने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळले, तर पालकांनाही मोठा दिलासा मिळाला. शिक्षणासाठी झटणाऱ्या या चिमुकल्यांच्या पाठीशी उभे राहून माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष जठार, शालेय समिती सदस्य ॲड. वासंती इथापे, डॉ. आशोक भोसले, आप्पा शिंदे, सुखदेव रामफळे, निजामअली पठाण, संतोष जठार, गुलाबराव रामफळे, अविनाश गटणे, विश्वनाथ भोसले, विलास सकट यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल यादव यांनी केले, तर प्राचार्य बापू झेंडे यांनी आभार मानले.
शाळेप्रती ऋणानुबंध जपणारी माजी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी परंपरा…
सरस्वती विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची ही मदत केवळ शालेय साहित्यापुरती मर्यादित नाही. यापूर्वी त्यांनी खास मुलींसाठी सुमारे दहा लाख रुपये खर्चून अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारून दिले आहे. तसेच अलीकडेच शाळेच्या नवीन इमारतीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या शाळेच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘शाळा घडवते माणूस आणि माणूस घडवतो शाळा’ याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
